(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : प्रकाश सोळंकेंना मंत्री व्हायचं होतं, अजितदादांना तशी संधी होती, मग सोळंकेंना मंत्री करायला काय हरकत होती? अजित पवारांच्या आरोपावरून जयंत पाटलांचा टोला
Jayat Patil Reply To Ajit Pawar : अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवेळी आपण त्या ठिकाणी नव्हतो, त्यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती नाही असं जयंत पाटील म्हणाले.
नाशिक : प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे ते नाराज होते, त्यावेळी अजितदादांनी (Deputy CM Ajit Pawar) मला न विचारता त्यांना कार्याध्यक्ष करण्याचा शब्द दिला, त्यामध्ये माझा काही रोल नव्हता असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलं. तसेच नव्या मंत्रिमंडळात अजितदादांनी प्रकाश सोळंकेंना संधी द्यायला हरकत नव्हती असा टोलाही त्यांनी लगावला. अजितदादांनी शरद पवार साहेबांशी जी चर्चा केली, ती आम्हाला वेळोवेळी सांगितली असती तर हे अंतर आम्ही पडू दिले नसते असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुळवड खेळली जात असल्याचं चित्र आहे. पहिला अजित पवार गटाकडून जयंत पाटलांवर आणि शरद पवारांवर टीका करण्यात आली. त्यानंतर शरद पवार गटाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला, पण तो पाळला नसल्याची टीका अजित पवारांनी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
मला न विचारता अजितदादांनी प्रकाश सोळंकेंना शब्द दिला
प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, मी बीड जिल्ह्यातून सीनिअर आहे मला मंत्री करा ही त्यांची अपेक्षा होती. त्यावर माझ्यासोबत सोळंके यांची चर्चा सुरू होती. तेव्हा अजितदादा त्या ठिकाणी आले आणि मला न विचारता त्यांनी प्रकाश सोळंके यांना कार्याध्यक्ष बनवण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये माझा काही रोल नव्हता. त्यानंतर पक्षाने कधी मला अध्यक्षपद सोडा, प्रकाश सोळंकेंना अध्यक्ष करायचे आहे असे सांगितले नाही. नंतर अजित पवारांसोबत ज्या लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली त्यामध्ये प्रकाश सोळंकेंना संधी द्यायला काय हरकत होती, तशी संधी अजित पवारांना होती.
पवार साहेबांशी काय चर्चा झाली ते दोघांनाच माहिती
आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं होतं, भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला बोलावलं होतं कशाला असा सवाल अजित पवारांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, "अशी कोणतीही बैठक झाली याची मला माहीत नाही. मी कोणत्याही व्यावसायिकच्या घरी बैठकीत उपस्थित नव्हतो. माझ्या घरी कुठलीच मिटींग झाली नाही. ते चुकीचा आरोप करत आहेत, मी मुद्दाम काही बोलत नाही. जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केले ते सर्व जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, कोणी कोणाशी काय चर्चा केली ते चार महिन्यांनी सांगत असतील त्यावर कसा विश्वास ठेवायचा? पवार साहेबांशी त्यांनी काय चर्चा केली हे त्या दोघांना माहीती आहे, तो त्या दोघांचा प्रश्न आहे. आम्हला खासगीमध्ये जी भूमिका सांगितली त्या प्रमाणे काम करत आहोत."
त्यांची चूल वेगळी, उमेदवार उभे करू शकतात
राज्यातील चार लोकसभांच्या निवडणुकीच्या जागांवर लढण्याचं अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या ठिकाणी अजित पवारांकडून उमेदवार देण्यात येणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, "त्यांची चूल आता वेगळी आहे. त्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यावर तक्रार करण्याची काही गरज नाही. पण जनतेचा आशीर्वाद हा शरद पवारांना आहे. त्यामुळे या जागा आम्ही जिंकू."
ही बातमी वाचा: