राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याच्या कामाचं मुल्यमापन होणार : जयंत पाटील
महाविकास आघाडीच्या खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर झाला आहे, मात्र आज खातेवाटप पूर्ण झाल्याने लगेच सर्व मंत्री कामाला लागतील. येत्या काळात आमचं सरकार अतिशय वेगाने काम करेल.
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात सत्तास्थापन केली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आज 43 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर झाला आहे, मात्र आज खातेवाटप पूर्ण झाल्याने लगेच सर्व मंत्री कामाला लागतील. येत्या काळात आमचं सरकार अतिशय वेगाने काम करेल.
जयंत पाटील म्हणाले की, काळ वेगाने पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांच्या कामांचं मुल्यमापन ठराविक काळाने व्हायलाच हवं. एखाद्या मंत्र्याला जे खातं (मंत्रीपद) सोपवलं आहे, त्याने ती जबाबदारी नीट पार पाडली आहे का? त्याने किती कामं केली आहेत? त्याने मंत्रीपद सांभाळत पक्षामध्ये किती काम केलं? या सर्व गोष्टींचं मुल्यमापन केलं जाईल.
जयंत पाटील म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचे मुल्यमापन करेन. त्यानुसारच नेत्यांबाबतचे पुढील निर्णय घेतले जातील.
मुलाखतीदरम्यान पाटील यांना विचारण्यात आले की, खातेवाटपास इतका विलंब का लागला? यावर पाटील म्हणाले की, खातेवाटप अगोदर निश्चित करण्यात आलं होतं. परंतु त्यात थोडे बदल करावे लागले. त्यासाठी पुन्हा चर्चा कराव्या लागल्या. त्यामुळेच अंतिम खातेवाटपास उशीर झाला.
पाटील म्हणाले की, खातेवाटपास विलंब झाला आहे, मात्र याच काळात आमचं सरकार काम करत होतं. याच कालावधीत शेतकरी कर्जमाफीबाबतची कार्यवाही करण्यात आली.
पक्षांतर्गत नाराजीनाट्याबाबत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, प्रत्येक पक्षाला त्यांचं हित जपावं लागतं. खातेवाटपादरम्यान तिन्ही पक्षांनी त्याचा विचार केला. तिन्ही पक्षांमध्ये काही लोक मंत्रीपद न मिळाल्याने नाराज होते. तर काही खात्यांबाबत तिन्ही पक्ष अनुकूल होते. परंतु आम्ही चर्चेद्वारे त्यावर मार्ग काढला. चर्चेअंती तिन्ही पक्षांचं समाधान झालं आहे. आमच्याकडचा कोणताही मंत्री नाराज नाही. सर्वांना कामाची संधी मिळाली आहे. आम्ही राज्याच्या अपेक्षा पूर्ण करु.
राज्यातल्या तरुण मंत्र्यांना सल्ला देताना पाटील म्हणाले की, तरुण नेते उर्जेने काम करतात. परंतु त्यांनी प्रशासन कसं चालतं? याची माहिती घ्यावी. तरुणांना वाटतं तात्काळ काम व्हावं. परंतु त्यांनी कामाच्या प्रकियेचा अभ्यास करावा. प्रक्रिया पूर्ण होऊन झालेली कामं दिर्घकाळ टिकतात, हे त्यांनी लक्षात घ्यावं. मनावर ताबा ठेवून त्यांनी जनतेच्या हिताची कामं करायला हवीत. जनतेशी संपर्क ठेवावा.