मराठवाड्याला दिलासा! जायकवाडीच्या 18 दरवाजांमधून गोदापात्रात 9432 क्युसेक वेगाने पाण्याने विसर्ग सुरु
छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातून गोदापत्रात मंगळवारी 9432 क्युसेक वेगाने पाण्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जायकवाडी धरण 97.30 क्षमतेने भरल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक नगर विभागात गोदावरीला पूर आला होता. परिणामी पुराचे पाणी थेट जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. जलसंपदा विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, पाण्याची पातळी पाहून पुढील पाण्याचा विसर्ग वाढवायचा का नाही हे ठरवले जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान जायकवाडीच्या पाण्याने भागते. याशिवाय औष्णिक वीज प्रकल्पाला तसेच शेती सिंचन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सोमवारी दुपारी आधी सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आले. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
मराठवाड्यात पावसाने 7 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मराठवाड्यात झालेल्या पावसाने 22 लाख 48 हजार 445 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून 17 लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झाला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व जालना जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.
जायकवाडीतून 3733 गोदावरीत विसर्ग सुरू
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाच्या बारा दरवाजांमधून सध्या गोदावरी पात्रात विसर्ग सुरू असून 373 क्युसेक वेगाने गोदावरीत पाण्याची आवक होत आहे.
मराठवाड्यातील धरणे काठोकाठ?
मराठवाड्यातील प्रमुख धरण आता भरत आल्याचे चित्र असून काही धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होत आहे. जलसंपदा विभागानुसार, परभणीच्या निम्न दुधना प्रकल्पात सध्या 75 टक्के पाणीसाठा असून येलदरीत 73% जलसाठा आहे. बीडच्या माजलगाव धरणात 37.98% पाणीसाठा झाला असून मांजरा धरणामध्ये 76.11% जलसाठा झालाय. नांदेडच्या उर्ध्वपनगंगेत 33.40% जलसाठा असून धाराशिवचे तेरणा धरण अजूनही दोन टक्क्यांवर आहे.