Jalna : समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरीच्या घटनेला दोन महिने पूर्ण; आरोपी मोकाटच, तपास आता SITकडे
समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला दोन महिने उलटूनही चोर अजूनही मोकाट आहेत.
Jalna Swami Samarth Murti Chori: जालना जिल्ह्यातील (Jalna District) समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला दोन महिने उलटूनही चोर अजूनही मोकाट आहेत. आता या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत करण्यात येणार आहे. पोलीस महसंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात येणार असून यात जालन्यासह, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादमधील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली जाणार आहे.
22 ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या राम मूर्तीचा तपास कालपर्यंत जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू होता. मात्र यात पोलिसांना यश येत नव्हतं. काही दिवसापूर्वी समर्थ मंदिराचे विश्वस्त गावकऱ्यांची राज्यातील समर्थांच्या मठातील मठाधिपतीची बैठक ठेवली होती. ज्या बैठकीमध्ये प्रशासनाला 20 नोव्हेंबर पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. यानंतरही तपास न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा या बैठकीत इशारा देण्यात आला होता.
प्रशासनावर यामुळे दबाव वाढत होता. काही दिवसांपूर्वी मंदिराचे विश्वस्त आणि गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सखोल तपासाचे आश्वासन दिले होते. त्या नंतर महासंचालकांच्या याच सूचनेवरून आजपासून SITची टीम आता याचा तपास करणार आहे.
कोणकोणत्या मूर्ती चोरीला गेल्या?
1) 'श्रीराम पंचायतन' मूर्ती चोरीला गेली. राम ,लक्ष्मण, सीता, भरत ,शत्रूघ्न अशा एकत्रित मूर्ती असलेले पंचधातूचे पंचायतन चोरीला गेले. दुसरी मूर्ती श्रीराम ,सीता आणि लक्ष्मण यांची एकत्रित असलेली स्वतः समर्थांनी स्थापित केलेली मूर्ती होती. पंचधातूच्या हनुमानाच्या दोन मूर्ती. दीड ते दोन फूट उंचीच्या आणि दहा किलो वजनाच्या या मूर्ती होत्या. भिक्षेच्या वेळी समर्थ बाळगत असलेल्या पंचधातूची पाच इंचाची हनुमानाची मूर्ती. राम-लक्ष्मण-सीतेसमोर ठेवलेली जमुवंतची पंचधातूंची मूर्ती.
पोलिसांकडून दोन लाखांचे बक्षीस जाहीर...
अद्यापही पोलिसांना मूर्तींचा किंवा चोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी चोरी झालेल्या मूर्तींची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. जालना जिल्हा पोलिसांनी यासाठी तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मूर्तींसंदर्भात कोणतेही माहिती असल्यास याची माहिती नागरिकांनी पोलिसांना तत्काळ देण्याचे आवाहन जालना पोलिसांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या...