(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय सांगता! नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचले पालकमंत्री; विरोधकांकडून हल्लाबोल
मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी देखील आज जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र पाहणीसाठी आलेले सावे चक्क सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Jalna News: मराठवाड्यात परतीच्या पावसाने (Marathwada Rains Updates) अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी देखील आज जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र पाहणीसाठी आलेले अतुल सावे चक्क सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताय मग सजवलेली बैलगाडी कशाला? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
अतुल सावे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंबड (Jalna Ambad News) तालुक्यातील धनगरपिंपरी महसुल मंडळामध्ये मौजे सारंगपूर, हस्तपोखरी येथे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र ज्या बैलगाडीतून त्यांनी पाहणी केली ती चक्क सजवलेली होती. त्यामुळे मंत्री पाहणीसाठी आले असतांना असा शाही थाट कशाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते दानवेंची टीका
अतुल सावे (Atul Save) यांनी सजवलेल्या बैलगाडीतून नुकसानग्रस्त पाहणी केल्याच्या घटनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देताना सावेंवर टीका केली आहे. पाहणीसाठी जाताना रस्ता नसल्याने बैलगाडीचा वापर करणं समजू शकतो, मात्र सजवलेली गाडीचा वापर करणं म्हणजे आपण काही आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जातोय का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मंत्र्यांनी जबाबदारीने वागायला पाहिजे.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान...
आधीच अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकरी अडचणी सापडला आहे. त्यातच आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. औरंगाबाद, जालन्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. सोयाबीन, कापसासह सर्वच पीक मातीमोल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.
हे देखील नक्की वाचा