(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माणुसकीच्या ट्रॅकवर ट्रेन उलटी धावते तेव्हा...
अपघात आणि रेल्वे हे जणू समीकरणचं झालं आहे. पण एका मोटरमनने अपघातग्रस्त प्रवाशासाठी जे काही केलं आहे त्यातून आपल्या सर्वांसमोर एक आगळंवेगळं उदाहरण ठेवलं आहे. रेल्वेतून पडून गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशाला घेण्यासाठी रेल्वे पुन्हा दीड किलोमीटर मागे घेण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील परधाडे माहिजी दरम्यान घडली आहे.
जळगाव : अपघात आणि रेल्वे हे जणू समीकरणचं झालं आहे. पण एका मोटरमनने अपघातग्रस्त प्रवाशासाठी जे काही केलं आहे त्यातून आपल्या सर्वांसमोर एक आगळंवेगळं उदाहरण ठेवलं आहे. रेल्वेतून पडून गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशाला घेण्यासाठी रेल्वे पुन्हा दीड किलोमीटर मागे घेण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील परधाडे माहिजी दरम्यान घडली आहे.
देवळाली भुसावल शटलने प्रवास करीत असताना पाचोरा येथील तरुण राहुल पाटील हा परधाडे ते माहिजी गावा जवळ रेल्वेतून खाली पडला होता. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी चेन ओढून रेल्वे थांबविली होती. मात्र चेन ओढल्यानंतर ही रेल्वे दीड किलोमीटर पुढे थांबली होती. यावेळी जखमी प्रवाशाला तातडीच्या उपचाराची गरज असल्याचे प्रवाशांनी गार्ड आणि चालकाला रेल्वे मागे घेण्याची विनंती केली असता, प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी रेल्वे पुन्हा मागे घेण्यात आल्याचे आणि जखमी प्रवाशाला त्यात बसवून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने ही या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या अनोख्या माणुसकीचे कौतुक होत असले तरी आशा प्रकार पुढे जात असलेली रेल्वे पुन्हा मागे धावल्याने अनेक प्रवाशांना मात्र कोड पडल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाहा व्हिडीओ : रेल्वेतून पडलेल्या जखमी प्रवाशासाठी रेल्वे उलट धावली, रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक
रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मुळेच आणि प्रवाशांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपल्या मुलाचा जीव वाचला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्यांची भेट झाली तर त्यांचा सत्कार ही करू अशी भावनिक प्रतिक्रिया रेल्वेतून पडलेल्या राहुल पाटील यांचे वडील संजय पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
देवळाली भुसावळ शटल ने येत असताना राहुल हा रेल्वेतून खाली पडल्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत सोडून न देता, त्याचा जीव वाचावा म्हणून त्याला घेण्यासाठी रेल्वे पुन्हा दीड किलोमीटर माघारी गेल्याने दिवस भर चर्चेचा विषय झाला आहे. अनेकदा रेल्वे सेवेच्या तक्रारीच ऐकायला मिळत असताना, रेल्वेच्या या माणुसकीच्या निर्णयामुळे राहुल पाटील यांचा जीव वाचल्याने रेल्वे प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.