वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, जळगावमधील खळबळजनक घटना
Jalgaon News : जळगावमधील भुमिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Jalgaon News : जळगावमधील भुमिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव संजय नामदेव पाटील असं आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही घटना घडली. मयत संजय पाटील यांना मानसिक त्रास देणाऱ्या अधिकार्यांवर जोपर्यंत अटकेची कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका परिवाराने घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालय येथील निमातदार म्हणून कार्यरत असलेल्या संजय पाटील यांना नेहमीच आपल्या वरिष्ठांच्या कडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी दहा दिवसांपूर्वी एरंडोल भूमी अभिलेख कार्यालय येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विष प्राशन केल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. उपचारासाठी त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दहा दिवसांपासून संजय पाटील हे मृत्यूशी झुंज देत होते. पण आज शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिवाराने संताप व्यक्त केला आहे. या घटनेत विष प्राशन करण्यापूर्वी संजय पाटील यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी मानसिक त्रास देणाऱ्या व्ही एल पाटील, डी बी जाधव आणि ठाकूर यांच्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करून त्यांचं निलंबन करण्यात यावे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही प्रेतावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशाप्रकारची भूमिका मयत संजय पाटील यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
दहा दिवसांपासून संजय पाटील हे रुग्णालयात उपचार घेत आहेत, मात्र कोणताही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली नाही की विचारपूस केली नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांना अटक करण्यात यावी. निलंबित करण्यात यावे तसेच आम्हाला न्याय मिळावा एवढीच आपली मागणी सरकारकडे असल्याचं मयत संजय पाटील यांच्या कुटंबाने म्हटलेय.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live