'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो'; मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य
Jalgaon Gulabrao Patil News : उद्धव ठाकरे हे जर पंतप्रधान झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
Jalgaon Gulabrao Patil News : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या बेधडक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी त्यांनी केलेल्या भाषणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उद्धव ठाकरे हे जर पंतप्रधान झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किलपणे पण का होईना मुख्यमंत्रीपदाचा मनोदय बोलून दाखवला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणापूर्वी आमदार किशोर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदानंतर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असं म्हटलं. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, किशोर पाटील म्हणाले की मला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान झाले तर मला मुख्यमंत्री होता येईल, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे आगामी काळात आमचाच मुख्यमंत्री होईल जाहीर वक्तव्य करत असतानाच दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने केलेल्या भाषणात मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं चर्चा सुरु झाली आहे.
मी राजकारणात आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पाळधी या गावात सभा पार पडली. गुलाबराव पाटील म्हणाले की, हा गुलाबराव पाटील मंत्री होणे शक्यच नव्हते. जनतेच्या आशिर्वाद प्रेमामुळे ते होऊ शकलं. मी राजकारणात आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो, असंही ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता मंत्री असल्याने विरोधकांना पाहिजे त्या शब्दात उत्तर देता येत नाही, मात्र कीर्तनकार असतो तर इंदुरीकर महाराजांच्या सोबतच राहिलो असतो. अर्ध्या कीर्तनकारांची दुकानं बंद करून टाकली असती, असंही ते म्हणाले. नाटकातही काम केलं असल्याची आठवण करून देत त्या नाटकातून निघालो राजकारणाच्या नाटकात आलो असल्याचेही, मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.