भाजपने त्यांच्याजवळ गेलेल्या नेत्याला, पक्षाला संपवले हा इतिहास, राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत : रोहित पवार
"राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करणारी भाजपाची भाषा करत आहेत. मात्र भाजपने त्यांच्याजवळ गेलेल्या नेत्याला किंवा पक्षाला संपवले आहे. त्यामुळे त्यांनी जपून पावले टाकावीत," असा सल्ला रोहित पवार यांनी दिला
पंढरपूर : "महाराष्ट्रात भाजपाला आणण्यात शिवसेनाच जबाबदार असून पुन्हा पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला संपवण्याचा प्रकार सुरु केला आहे. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपसोबत सलगी वाढवत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा," असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. आज (7 एप्रिल) कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवास भूमिपूजनासाठी आमदार रोहित पवार पंढरपुरात आले होते.
"राज ठाकरे आता जातीय तेढ निर्माण करणारी भाजपाची भाषा करत आहेत. मात्र भाजपने त्यांच्या जवळ गेलेल्या नेत्याला किंवा पक्षाला संपवले आहे. त्यामुळे ठाकरेंनी जपून पावले टाकावीत," अशा शब्दात रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिला.
सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत असा असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना दिला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांनी भावनिक होऊन असे शब्द वापरल्याचे सांगत त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं म्हटलं. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो.
भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली असली तरी बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असा सल्लाही आमदार पवार यांनी दिला आहे.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आता मतदारांना ईडीची धमकी देत आहे. मात्र कोल्हापूरचा मतदार भाजपच्या या धमक्यांना घाबरणार नसून इथे काँग्रेस उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सध्या महाविकास आघाडीतील घटकपक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात ईडीकडे तक्रारी करत असल्याचे निदर्शनास आणताच राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण सोपं नव्हतं आणि 35 वर्षाच्या सवयी लगेच बदलत नसतात, असा खुलासा करत अजूनही खालच्या पातळीवर वाद असल्याची कबुली त्यांनी दिली.