एक्स्प्लोर

EXCLUSIVE : खासदार राजू शेट्टी यांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी

प्रश्न : तुम्ही सत्तेतून बाहेर कधी पडता आहात? राजू शेट्टी : सत्तेतून नेमकं कधी पडतो बाहेर, हे सांगता येत नाही. परंतू, सध्याची भारतीय जनता पक्षाची एकूण वाटचाल आणि मित्रपक्षाबद्दल त्यांचं वागणं लक्षात घेता, कधीतरी या निर्णयापर्यंत यावं लागेल असं मला वाटतंय. कारण आता ही मंडळी इतक्या टोकाला गेलेली आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज मंडळी कोण आहेत, त्यांना भेटा, आमच्याकडून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना भाजपची उमेदवारी देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जणूकाही मित्राचं घर फोडण्यातलाच प्रकार आहे. असं जर का यांची वागणूक असेल, तर एखाद्याला आपण विश्वासाने घरात घेत असतो, विश्वासाने त्यांच्याशी व्यवहार करत असतो. पण घरात आल्यानंतर घरातल्या माणसाचा जर घरोबा व्हायला लागला किंवा घरातल्याच नाराजीचा गैरफायदा मित्रच घ्यायला लागले, तर ही फार चांगली गोष्ट आहे, अशातला भाग नाही. प्रश्न : थोड स्पेसिफिक करुन सांगा. छोटे-छोटे कुठले कार्यकर्ते आहेत, की ज्यांना भाजपने जवळ घेतलं आणि दिलं? राजू शेट्टी : विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तगडे उमेदवार होते. मात्र, तगडे उमेदवार असले, तरी एकाला कुणालातरी थांब म्हणून सांगावच लागतं. मग थांब म्हणून सांगितलेल्या उमेदावाराला जाऊन भेटणं, त्याला भाजपच्या उमेदवारीची ऑफर देणं, असे प्रकार घडायला लागेल आहेत. आणि ही काही फार चांगली गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. प्रश्न : आणि सदाभाऊ तर आता फारच मुख्यमंत्र्यांच्या क्लोज आहेत. राजू शेट्टी : नाही, सदाऊभा शेवटी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्यांनाही कधीतरी निर्णय घ्यायचा आहे की, चळवळ की सत्ता. पण मला खात्री आहे की, त्यांना असा निर्णय घेण्याचा प्रसंग आला, तर ते चळवळीच्या बाजूनेच राहतील. प्रश्न : असा निर्णय घेण्याची ती वेळ आलेली आहे सदाभाऊंवर? राजू शेट्टी : गेल्यावर्षी आम्ही अक्षय्य तृतियेला तुळजाभवनीला साकडं घालून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. किसान ऋणमुक्ती राष्ट्रीय अभियानाला आम्ही आता धार आणतोय या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर. मग शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न असतील. जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढणार असतील, शेतकऱ्याला हमीभावापेक्षा कमी दरात शेतीमाल विकायला लागत असेल, तर चळवळ म्हणून आम्हाला काही ठोस भूमिका घ्यावी लागेल. 1 प्रश्न : पण सदाभाऊंना हे खूप अवघड आहे ना. कारण तुम्ही एकीकडे ही भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची मांडताय, तर दुसरीकडे सत्तेत राहून सदाभाऊ कसं म्हणणार की, हे सरकारचं धोरण योग्य आहे? राजू शेट्टी : नाही..नाही.. शेवटी सदाभाऊंना संघटना आणि संघटेनेच्या धोरणाशीच सहमत व्हावं लागेल. त्यामुळे मी माझी भूमिका मांडत राहीन. ते त्यांच्या मर्यादेत राहून भूमिका मांडतील. परंतू, अंतिम निर्णय हा संघटनेचा राहील आणि संघटनेच्या कार्यकारिणीचा राहील. प्रश्न : ज्या पद्धतीचं राजकारण आता महाराष्ट्रात सुरु आहे. एककीडे तुम्ही थेट आरोप केलाय की, भाजप तुमचा पक्ष फोडतोय. महाराष्ट्रातला शेतकरी एवढा वेडा नाहीय की, एकीकडे शेतकऱ्यांची मतं घेऊन खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असं म्हणतायेत, दुसरीकडे सदाभाऊ मंत्रिमंडळात आहेत. राजू शेट्टी : सदाभाऊंना मंत्री करुन भारतीय जनता पार्टीने काय आमच्यावर उपकार केले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे त्यांचे 30 आमदार निवडून आले आहेत, हे तेही नाकारत नाहीत. आणि मग, आज त्यांना जे काही संख्याबळ मिळाले आहे, आज त्यांना जो काही ग्रामीण भागामध्ये नसलेला जनाधार मिळालेला आहे, तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळालेला आहे. हे ते नाकारुच शकत नाहीत. किंबहुना तेही मान्य करतात. मुळामध्ये राजकारण हा काही आमचा धंदा नाहीय. राजकारण करणं एवढंच आमचं उद्दिष्ट नाहीय. मुळात आम्ही राजकारणात का आलो? तर आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, आमच्या प्रश्नांचा दबावगट तयार करुन, राज्यकर्त्यांवर दबावगटाच्या माध्यमातून आमचे प्रश्न मार्गी लागतात का, हे बघण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. अन्यथा राजकारण हे काही आमचं क्षेत्र नाही. प्रश्न : म्हणूनच मी विचारलं, तुम्ही केव्हा बाहेर पडत आहात सत्तेतून? राजू शेट्टी : ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी पडू शकतो. प्रश्न : आता ती गरज नाहीय? राजू शेट्टी : आता बघू ना.. जिल्हा परिषदेचे निकाल बाहेर येऊ द्या. किंबहुना येत्या महिना-दीड महिन्यात एकूणच राजकारणातील समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न : काय असतील ते बदल? राजू शेट्टी : काहीही असू शकतात. आज ग्रामीण भागामध्ये, शेतकऱ्यांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये जो असंतोष आहे, तो असंतोष जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीतून व्यक्त झाला, तर प्रत्येक पक्षाला अंतर्मुख व्हावंच लागणार आहे आणि आपल्या धोरणाबद्दल पुनर्विचार करावाच लागणार आहे. 2 प्रश्न : म्हणजे तो विरोधी गेला, तर तुम्ही बाहेर पडणार? राजू शेट्टी : शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाची संघटना आहे? शेतकऱ्यांची संघटना आहे, ग्रामीण भागातील लोकांची संघटना आहे. त्यांचा मूड एकूण काय आहे, त्यांचा कल काय आहे, याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रश्न : सदाभाऊंशी तुमचं बोलणं झालंय का हल्ली? राजू शेट्टी : सदाभाऊंशी काय, दररोजच बोलणं होत असतं. प्रश्न : आपल्याला केव्हा बाहेर पडायचं? तुम्हाला पक्ष संघटनेचा आदेश मान्य करावा लागेल, या मुद्द्यांवर बोलणं झालंय का? राजू शेट्टी : एक लक्षात घ्या, सदाभाऊ हे संपूर्ण कार्यकारिणीच्या संमतीने आणि संघटनेतील कार्यकर्त्यांच्या संमतीने मंत्री झाले आहेत. कारण कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेला माणूस मंत्री कधी होतो, ज्यावेळी एखाद्या पक्षाचा किंवा संघटनेच्या वतीने पाठवलेला असतो, त्याचवेळी ही संधी मिळते. त्यामुळे सदाभाऊंचं मंत्री असणं, हा संघटनेचा अधिकार आहे. फक्त संघटनेच्या वतीने एक चेहरा म्हणून सदाभाऊंना आम्ही तिथे पाठवलं आहे मंत्रिमंडळामध्ये. प्रश्न : आता संघटनेला असं वाटतं की, आता सदाभाऊंची ती योग्य वेळ आहे की, आता सत्ता, पक्ष संघटना की आपले मुद्दे? राजू शेट्टी : नाही. अजून ठरवण्याची वेळ आलेली नाही. ज्यावेळी ठरवेल, त्यावेळी आम्ही सांगू. सदाभाऊंना बोलवावं वाटलं, तर तो अधिकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा असेल. प्रश्न : पण सदाभाऊ जेवढ्या क्लोज गेलेत भाजपच्या, त्यावरुन इतक्या सहजासहजी ते होणार नाही, असं वाटतंय. राजू शेट्टी : अनेकवेळा असं वाटतंय की, सदाभाऊ अमक्याच्या जवळ गेलेत, तमक्याच्या जवळ गेलेत. पण सदाभाऊ हे शेवटी संघटनेचेच असतात. असा प्रयोग अनेकांनी करुन बघितला आहे. पण तसं काही घडलं नाही. प्रश्न : कुणी कुणी केला होता प्रयोग? राजू शेट्टी : यापूर्वी घडलेला आहे. आता त्या विषयात जाण्यात अर्थ नाही. परंतू, सदाभाऊ हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेले आहेत. त्यामुळे ते चळवळीशी द्रोह करत नाहीत आणि करणार नाही, याची मला खात्री आहे. किंबहुना, सदाभाऊंनी तिथं असणं, ही एक आमची स्ट्रॅटेजी आहे. प्रश्न : हा जो पक्षफोडीचा प्रयत्न चंद्रकांतदादा पाटील करत आहेत का? कारण भाजपकडून कोल्हापूरचा चार्ज चंद्रकांतदादांकडे आहे. राजू शेट्टी : चंद्रकांतदादा करतायेत किंवा त्यांच्या पाठीमागे पक्षातील लोक करतायेत, मला माहीत नाही. परंतू, अशा पद्धतीने हे करणं आम्हाला मान्य नाही. आता भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात आम्ही कुठेच निवडणूक लढवत नाहीत. वाळवा तालुक्यात फक्त सर्वपक्षीय आघाडी केली, त्यात एक भाजप आहे. हा अपवाद सोडला, तर सगळीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतो आहोत. काँग्रेससोबतही आम्ही अंतर ठेवून आहोत. एक-दोन ठिकाणी स्थानिक गटापुरती काँग्रेससोबत आहोत. परंतू, व्यापक तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर अशी आमची आघाडी नाही. राष्ट्रवादीसोबत आमचं कधीच जमत नाही. शिवसेनेच्या बाबतीत काही ठिकाणी सामंजस्य आहे. पण आघाडी अशी काही नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी काही लढाई आहे, ती एकाकी आहे. 3 प्रश्न : मग या ज्या ऑफर्स दिल्या जात आहेत, त्या काय ऑफर आहेत? तुमचा माणूस फोडायचा, ही ती ऑफर आहे. राजू शेट्टी : आमच्या पक्षामार्फत निवडणूक लढवा, निवडणुकीला खर्चाला पैसे देतो. प्रश्न : किती? राजू शेट्टी : एक गटासाठी 20-25 लाखपर्यंत अशा ऑफर आहेत. परंतु, स्वाभिमानीचा कार्यकर्ता अशाप्रकारे घेणं, ही एवढी सोपी गोष्ट नाही. प्रश्न : तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललात, हे बरोबर नाही? राजू शेट्टी : मी निकालानंतरच बोलेन. प्रश्न : किंवा भाजपमधील महत्त्वाचे लोक. किमान चंद्रकांतदादांशी? राजू शेट्टी : मी कुणाबरोबरही बोललो नाही. ज्या कार्यकर्त्यांकडे या ऑफर आल्यात, त्यांनी मला येऊन सांगतलं की असं असं आलेलं आहे. पण अभिमान या गोष्टीचा वाटतो की, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी माझ्याकडे कसलंही 'बंधन' नाही. तरीसुद्धा कार्यकर्ते सांगतात, आम्हाला असा निर्णय घ्यायचा नाही. हीच आमच्या विचाराची ताकद आहे. प्रश्न : किती कार्यकर्त्यांच्या बाबतीत झालं? राजू शेट्टी : दोन-चार कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. प्रश्न : तुम्ही जे म्हणताय, ते एका अर्थाने, शिवसेनेचा जो आरोप आहे, मित्रांच्या बरोबर राहून मित्राच्या खंजीर खुपसलं, अगदी तसंच. राजू शेट्टी : माझं म्हणणं असंय की, तुमचे कार्यकर्ते घडवा. त्यांच्यावर संस्कार करा. कारण स्वाभिमानीच्या चळवळीतून, मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते एका रात्रीत तयार झालेले नाहीत. गेल्या 15 वर्षांपासून माझे कार्यकर्ते रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खातायेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतायेत. त्यांच्यावर वैचारिक संस्कार आम्ही करतो. कार्यशाळा घेतो. एखादा विषय दोन-तीन दिवस समजावून सांगत असतो. अशा पद्धतीने आम्ही कार्यकर्ता घडवत असतो. विचाराने घडवत असतो. आणि अशा कार्यकर्त्यांवर मोहजाल टाकणं योग्य नाही. प्रश्न : भाजपची स्टार कॅम्पेनरची यादी आहे ना, त्यात सहा नेते आहेत. त्यात सदाभाऊही आहेत. राजू शेट्टी : सदाभाऊ फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारातच आहेत. प्रश्न : भाजपचा प्रचार करणार नाही? राजू शेट्टी : प्रश्नच नाही. भाजपने भले स्टार प्रचारकांच्या यादीत टाकलं असेल. पण आम्हाला गरज आहे ना सदाभाऊंची. प्रश्न : तुम्ही सदाभाऊंशी बोललात की, आपण भाजपचा प्रचार नाही केला पाहिजे? राजू शेट्टी : सदाभाऊंच्या प्रचारकार्याची गरज आम्हाला आहे. आम्ही आमच्या उमेदवारांचा प्रचार सोडून मित्रपक्षांच्या प्रचारासाठी सदाभाऊंना कसं सोडू? सोडणार नाही आम्ही. प्रश्न : पण ही काय स्ट्रॅटेजी आहे मुख्यमंत्र्यांची? अचानकपणे सदाभाऊंना इतक्या जवळ घेतलं, इतक्या महत्त्वाची दोन-तीन खातीही दिली. राजू शेट्टी : मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, एवढंच त्यांचं नातं आहे. असं जिव्हाळ्याचं नातं आहे, असं काही नाही. प्रश्न : पण त्यांच्या पक्षात तेवढी महत्त्वाची आहेत की माणसं. राजू शेट्टी : चळवळीतील कार्यकर्ते हे खणखणीत नाणं असतं. प्रश्न : तुमच्यापासून जाणीवपूर्क दुरावण्याचा एक प्रयत्न सुरु आहे? राजू शेट्टी : आमच्यापासून किंवा चळवळीपासून दुरावण्याचा सदाभाऊंना कारणच काय? आणि दुरावयाचे होते, तर ते यापूर्वीच दुरावले असते. प्रश्न : पण तो प्रयत्न तर सुरु आहे. राजू शेट्टी : त्यांना लाख प्रयत्न करु देत. परंतू, आमचा आमच्या विचारावर विश्वास आहे. प्रश्न : पण तसे प्रयत्न सुरु आहेत, हेही मान्य केले पाहिजे? राजू शेट्टी : प्रयत्न असले, तरी त्यांना यश येत नाही ना. येणारही नाही. प्रश्न : प्रयत्न सुरु आहेत? राजू शेट्टी : आता ज्याअर्थी, आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या संदर्भात प्रयत्न सुरु असतील, तर असेही प्रयत्न सुरु असणारच. परंतु सदाभाऊ हे चळवळीच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. ते कसे काय जातील? आणि समजा यदा-कदाचित त्यांना मोह झाला, तर त्यांचा पाशा पटेल होईल. पाशा पटेल हे चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते होते. आज पाशा पटेलांची अवस्था भाजपच्या नेतृत्त्वाने कशी केली आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे सदाभाऊ तेवढे हुशार आहेत. तसला काही निर्णय घेणार नाहीत. प्रश्न : तुमची सदिच्छा आहे की, सदाभाऊंचा पाशा पटेल होऊ नये? राजू शेट्टी : सदिच्छा नाही, इच्छा आहे. कारण सदाभाऊ हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे आणि मित्राचं वाईट व्हावं, अशा विचारसरणीचा मी तरी नाही. प्रश्न : इकडे तुम्ही सत्तेत आहात. दुसरीकडे तुमची जी लातूरची शाखा आहे, तिने पत्रक काढलंय की, करशील का भाजपला मतदान? राजू शेट्टी : लातूरमधील कार्यकर्त्यांची तशी भावना होणं सहाजिकच आहे. कारण दोन-अडीच वर्षांपूर्वी तुरीला बाजारात असणारा भाव, सोयाबीनला असणारा भाव, कांद्याला असणारा भाव आणि आज बाजारात मिळणारा भाव, याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. हा जो काही दराचा आलेख ढासळला आहे, त्याला केंद्र सरकारचा नादानपणा आणि नियोजन नसणं, हेच कारण आहे. कारण दुष्काळानंतर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर मान्सूनचा पिक चांगला येणार आहे, याचा अंदाज आधीच यायला हवा होता. अशा परिस्थितीमध्ये तूर आयात करण्याची आवश्यकता नव्हती. खाद्यतेलाच्या आयातीवरही थोडं नियंत्रण आणायला हवं होतं. ते न केल्यामुळे सोयाबीनच्या किंमती पडल्या. 200 रुपये डाळ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने मोठा पेरा केला. किंमान तुरीला 80-90 रुपये तरी मिळतील, ही अपेक्षा होती. परंतू, आज तुरीचा भाव 40-42 पर्यंत खाली आला. म्हणजे हे नियोजन नसणं, हे कारण आहे. शेतकऱ्यांनी पिकवलं, त्यांचा माल बाजारात आला. पण त्याच्यासाठी जी काही पूर्वतयारी करायला हवी होती, ती पूर्वतयारी करायची जबाबदारी सरकारची आहे. आज जर का शेतकऱ्यांचा तोटा होत असेल, तर शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांची मानसिकता होत असेल. म्हणून कार्यकर्त्यांच्या मताशी सहमत आहे. प्रश्न : पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप सारी घराणेशाही आहे. राजू शेट्टी : घराणेशाहीला आमचा विरोधच आहे. ही काही वंश परंपरा नाही. सरंजामशाही गेलेली आहे, लोकशाही आलेली आहे. पूर्वी राणीच्या पोटाला राजा जन्माला यायचं आहे. आता काळ बदलला आहे, राजाच्या ऐवजी लोकप्रतिनिधी आला. लोकप्रतिनिधी हा काही लोकप्रतिनिधीच्या पोटाला जन्माला आलेला असावा असं काही नाही. तो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो. माझं स्वत:चं उदाहरण आहे. 25-30 वर्षांपूर्वी सेवा सोसायटीत माझ्या वडिलांना सदस्य करावं, असंही कुणाला वाटलं नव्हतं. इतकं नगण्य महत्त्व असलेलं माझं कुटुंब होतं, त्या कुटुंबातील मुलगा जर एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार होत असेल, तर हा लोकशाहीचा विजय आहे. प्रश्न : तुमच्या कुटुंबातील कुणीच राजकारणत येणार नाही? राजू शेट्टी : नाही येणार. प्रश्न : सदाभाऊंचा मुलगा तर राजकारणात आला. राजू शेट्टी : हे सुद्धा मला काही फारसं आवडलेलं नाही. पण सदाभाऊंचं त्यावर उत्तर असंय की, त्या ठिकाणी दुसऱ्या एका मोठ्या नेत्याचा मुलगा घराणेशाहीच्या माध्यमातूनच लढतोय, त्यामुळे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, तगडी लढत झाली पाहिजे म्हणून तुमच्या मुलाला उभं करा. पण मी सदाभाऊंना स्पष्ट सांगतिलं, ही सबब मला काही पटत नाही आणि अशाप्रकारचं समर्थन मी तरी करु शकत नाही. माझा तत्त्वामध्ये हे बसत नाही. उलट आपण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला त्या प्रस्थापिताच्या विरोधात उभं करुन पूर्ण ताकदीने आपण दोघांनी तिथे लढत दिली पाहिजे. आपली मुलं हट्ट करत असतील, तर आपण बाजूला व्हावं आणि पोरांना संधी द्यावी, हा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. माझा मुलगा किंवा माझ्या घरातील नातेवाईक भविष्यात असं म्हणू लागले की, आम्हालाही राजकारणात यायचंय, तर मी त्यांना सांगेन, मी आता थांबतो, ज्यांना पुढे जायचंय त्यांनी जावं. प्रश्न : सदाभाऊ आणि तुमच्यात यावर चर्चा झाली? राजू शेट्टी : मला जे वाटतं, ते मी नेहमीच बोलून दाखवतो. मनात ठेवत नाही. प्रश्न : तुम्ही म्हणालात की, प्रचाराला सुद्धा मी येणार नाही. राजू शेट्टी : मला जे पटतं, तेच मी करतो. प्रश्न : युती राहील? राजू शेट्टी : ते कदाचित 25 फेब्रुवारीनंतर सांगता येईल. प्रश्न : शेतकरी सरकारच्या एकूण कारभारावर नाराज आहेत, अशी जनभावना आहे. मग सरकारबरोबर आहे कोण? राजू शेट्टी : वस्तुस्थिती खरी आहे. मी नाकारत नाही. हे सगळंच्या सगळं खापर हे सरकारवरच फुटतंय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार, दोघांचीही ही जबाबदारी आहे. एक लक्षात घ्या. जगभर तंत्रज्ञान आता पुढे गेलेलं आहे, गेल्या वर्षी पडलेल्या प्रचंड दुष्काळानंतर पाऊस पडणार, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नव्हती. पूर्व इतिहास तपासून बघितला असता, तर लक्षात आलं असतं दुष्काळानंतर पाऊस हा पडतोच. एवढी साधी गोष्ट समजायला हवी होती. जगभरामध्ये पुढच्या दोन वर्षात हवामान कसे राहील, याचे आडाखे तंतोतंत बांधले जातात. त्यानुसार यावर्षी देशभरात मान्सून चांगला येणार, हे माहित असायला हवे होते. मान्सून चांगला येणार मग, खरिपाची पिकं चांगली येणार, हे ओघानेच आलं. याचा अर्थ सोयाबीन आणि तूर या जिरायत बागांमध्ये चांगली पिकणार. ज्वारी चांगली पिकणार. हे सगळं असताना, सरकारी यंत्रणांमध्ये असणाऱ्यांना हे कळायला हवं होतं. मग गेल्यावर्षी डाळ आयात करण्याची गरजच काय होती? भरमसाठ खाद्यतेल आयात करण्याची गरजच काय होती? खाद्यतेल आयात केल्यामुळे आज सोयाबीनला भाव नाही. डाळ आयात केल्यामुळे आज तुरीला हमीभावाइतकीही किंमत मिळत नाही. प्रश्न : इतकी जर शेतकरीविरोधी धोरणं आहेत, तर तुम्ही कधी सत्तेतून बाहेर पडणार आहात? राजू शेट्टी : शिशुपालाचे 90 अपराध भरायला काही अवधी जावा लागतो. कारण तडकाफडकी निर्णय घेतला, तर काही लोक आम्हाला उतावळा ठरवण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जे काही घडायला लागलंय, ते चुकीचं घडायला लागलंय. ज्याप्रमाणे भूमी अधिग्रहणाबाबत ठोस भूमिका घेतली. ते बिल मागे घेईपर्यंत लढत राहिलो. बाजारभाव शेतकऱ्याच्या हातात नाही, निसर्गाच्या बिघडलेल्या चक्राला तो जबाबदार नाही, चंगळवाद्यांनी ऐश्योआरामासाठी निसर्गाची छेड काढली, पण शिक्षा शेतकऱ्याला भोगावी लागते. म्हणून त्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. 9 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट क्षेत्रातल्यांचे कर्ज रद्द होतात, तर शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करायला काय हरकत आहे? सातवा वेतन आयोग मंजूर केल्यानंतर वर्षाला 1 लाख 15 हजार कोटींचा बोजा तिजोरीवर पडतो, त्याबद्दल सरकार खळखळ करत नाही. मग शेतकऱ्याचा सातबारा कोरा करुन त्याचं आयुष्य नव्याने सुरु करुन द्यायला सरकारला काय अडचण आहे? ते व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. 4 प्रश्न : तुम्ही साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी शरद पवारांविरोधात तक्रार दिली. तुम्ही शिवाजीनगरला गेलात, तिथे ते झालं. त्या शरद पवारांना पद्मविभूषण दिलंय आता. राजू शेट्टी : पद्मविभूषण कुणाला द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, हा त्यांचा विषय आहे. पण सध्याच्या काळात पद्म पुरस्कार दिले जातात, त्याच्याबद्दलही माझ्या मनात संशय यायला लागलाय. प्रश्न : शरद पवारांच्या पद्मविभूषणबद्दल काय मत आहे? राजू शेट्टी : शरद पवारांना पद्मविभूषण दिलं, याबद्दल मला आक्षेप नाही. पण गेली 8 वर्षे मी केंद्र सरकारला पत्र लिहितोय की, भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना पदक द्या म्हणून मी गेली 8 वर्षे पाठपुरावा करतोय. पण मला उत्तर आलं की, मरणोत्तर देता येत नाही. 6 महिन्याच्या आतच ते जाहीर करावं लागतं. म्हणून काही काळ मी प्रयत्न थांबवले. दरम्यानच्या काळात आमच्या एनडीए सरकारने धीरुभाई अंबानींना त्यांच्या मृत्युनंतर 10 वर्षांनी मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर केला. मग मी पुन्हा पत्रव्यवहार केला की, धीरुभाई अंबानींना मिळू शकतं, मग आमच्या खाशाबा जाधव यांना का नाही? खाशाबा जाधव यांच्यासारखे अनेक लोक उपेक्षित आहेत पद्म पुरस्कारासाठी. अलिकडच्या काळात पद्म पुरस्कार राजकीय हेतूने दिले जातात की काय, असा संशय माझ्या मनात निर्माण झालाय. प्रश्न : असं पवारसाहेबांच्या बाबतीत वाटतं तुम्हाला? राजू शेट्टी : हो मग.. असे काहीतरी राजकीय आडाखे असणार. त्याशिवाय थोडंच. प्रश्न : काय असतील आडाखे, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, राष्ट्रपतीपदाची आहे. राजू शेट्टी : काहीही असू शकेल. आता भाजप मत्सुदी आणि विद्वान लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय आहे, हे माझ्यासारख्या सामान्य माणसांना कसं कळणार? प्रश्न : तुम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळणार होतं, तुम्ही म्हणालाही होतात, संधी दिली तर काम करेन. राजू शेट्टी : मी स्वत:हून केंद्रात मंत्रिपद मागायला कुणाकडेही गेलो नाही. समजा दिलं तर नाकारायचं नाही, असं मी ठरवलं होतं. याचं कारण मला कुणी पळपुटा म्हणता कामा नये. हे भाषणं करतात, मोर्चे काढतात, पण जबाबदारी घेण्याची वेळ आली, तर पळ काढतात, असा आरोप होऊ नये म्हणून मी ठरवलं होतं की, जबाबदारी देणार असाल तर मी माझ्यामधली क्षमता दाखवेन. प्रश्न : तुम्हाला दिलं नाही म्हणून राज्यात सदाभाऊंना दिलं? राजू शेट्टी : ती आमचीच मागणी होती आणि तो आमचा अधिकार होता. ते काही उपकार नाही केलेत कुणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत वाटा दिला हा काही उपकाराचा भाग नाही. हा काही दया नाही. भिक्षा नाही. तो अधिकार आहे. आमच्यामुळेच ते सत्तेत आहेत. प्रश्न : तुम्ही कोल्हापूर-सांगलीत, ज्याप्रकारे आघाड्या केल्या, ती निव्वळ भेसळ आहे. राजू शेट्टी : अहो आघाड्या केलेल्याच नाहीत. कुणी सांगतिलं आघाड्या केल्यात? मी माझ्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली की, 15-20 वर्षे तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढलेले आहात, तुम्हाला निवडून येण्यासाठी स्थानिक पद्धतीने स्थानिक पातळीवर जे काही करायचं असेल ते करा. तुम्ही निवडून या. पण निवडून आल्यानंतर चळवळीशी प्रतारणा करायची नाही आणि संघटनेच्या विचारानेच तुम्हाला वागावं लागेल, या अटीवर मी परवानगी दिली आहे. मी मुला-बाळांसाठी तर करत नाही, हे कार्यकर्त्यांसाठी केलंय. हे प्रस्थापित आपापल्या मुला-बाळांसाठी हे करत असतील, तर मी माझ्या सच्चा कार्यकर्त्यांसाठी का करु नये? मी माझ्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली, तर मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही. प्रश्न : शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश नाही जाणार? राजू शेट्टी : नाही जात. कारण शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्या संघटनेवर विश्वास आहे आणि आम्ही शेतकऱ्यांशी कधीही द्रोह करणार नाही. शेतकरी सोडून इतरांशी आम्हाला काही देणेघेणे नाही. प्रश्न : कवठे एकंदमध्ये सभेत नक्की काय प्रकार झाला? राजू शेट्टी : खरंतर हा सुद्धा एक बनाव आहे. कवठे एकंदची सभा माझी नियोजित सभा नव्हती. मी पलूसमध्ये एका लग्नसमारंभाला हजेरी लावून तिकडे उस्मानाबादला निघालो होतो आणि तिथल्या कार्यकर्त्यांना कळालं की, शेजारील गावातूनच मी जातोय. त्यामुळे आमच्या प्रचार शुभारंभाला फक्त नारळ फोडून जा, अशी त्या कार्यकर्त्यांनी विनंती केली. म्हणून त्या गावातूनच जात असताना मी नारळ फोडायला म्हणून तिथल्या मंदिरात थांबलो. परभणी, भूम, लातुरातील सभांची छायाचित्र पाहावीत, मग राजू शेट्टीचा प्रयोग फ्लॉप जातोय की, चांगला चाललाय, हे साऱ्या जगाला कळेल. खासदार राजू शेट्टी यांची संपूर्ण मुलाखत :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget