(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे : मुख्यमंत्री
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळं पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयासंदर्भात बोलताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, 1 ते 3 लाखापर्यंत पिक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यापूर्वी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत होतं. त्यावर 3 लाखापर्यंत कर्ज घेणार्या शेतकर्यांना 3 टक्के व्याज भरावे लागत होते. आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, असं ते म्हणाले. पाटील म्हणाले की, राज्यातील 45 लाख शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. यंदा सरकारने 60 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असंही ते म्हणाले.
Farmer Loan: ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज मिळणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांनी केली होती घोषणा
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, पीक कर्जावर व्याज देताना अनेकदा शेतकऱ्यांची अडचण होते. शेतकर्यांना व्याजाच्या बोजापासून मुक्त करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन त्यांना कर्ज थकबाकी होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक कर्जावरील व्याजाची रक्कम सरकार देईल. आवश्यक निधी शासनाकडून पुरविला जाईल, असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते.
या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
त्यानुसार आता विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर सरसकट ३ (तीन टक्के) व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल व केंद्र शासनामार्फत ही ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाचे परतफेड मुदतीत केल्यास ३% व्याज सवलत मिळते. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६% व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज ०% (शून्य) टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.