1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळासाठी शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळासाठी शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
मुंबई : राज्यभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या असल्याच शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री व कल्याण विभाग यांच्याशी चर्चा शिक्षणमंत्री करत असून याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. राज्यामध्ये वाशीम, लातूर, सातारा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं. सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.
तर दुसरीकडे, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी सुरू केली आहे.
तर, सोलापुरात 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीये. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मराठवाड्यातील लातूर शहरातील एमआयडीसी भागातील खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परवानगी नसतानाही शहरातील 170 पेक्षा जास्त खासगी हॉस्टेल सुरू असल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
एकीकडे शाळा राज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी अशा शाळा राज्यभरात प्रत्यक्षात सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आणि विद्यार्थ्यांना होणारी कोरोनची लागणार बघता, आता स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून एक मार्चपासून शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यासाठीचा निर्णय घ्यायचा आहे.