(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 40 जणांनी गमवला जीव
इंदूरमध्ये प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
Indore Temple Accident: मध्यप्रदेशमधील इंदूरच्या झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी अपघात झाला. विहिरीचं छत कोसळल्यानं भाविक विहिरीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाला 17 ते 18 जणांना वाचवण्यात यश आले, तर अजूनही काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर इंदूरमध्ये प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली तसेच मदतीचं आश्वासन देखील यावेळी दिलं . यावेळी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा देखील उपस्थित होते. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नेमकी दुर्घटना घडली कशी?
मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेलनगर भागातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी विहिरीवरील छत कोसळल्याची घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. इंदूरमध्ये घटलेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झालं आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.
विहीर 50 फूट खोल
रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. लोक पूजा अर्चा करत होते. या मंदिरात एक विहिर होती. ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सर्वजण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.