India Weather : पुढील पाच दिवस देशात वादळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात गारपीटीचा इशार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
India Weather : हवामान विभागानं (Meteorological Department) पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
India Weather : देशातील वातावरण सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसात मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतात गारपीट होण्याची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशात हिमवर्षाव, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस
याशिवाय दक्षिण भारतात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात 30 एप्रिल ते 2 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतातही जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पूर्व भारतात विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मे आणि 2 मे रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि 1 मे ते 4 मे दरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, अतिवृष्टीपासून आपली पिके वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: