कोरोनामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वाऱ्यामाप खर्चाला कात्री; यवतमाळमध्ये नोंदणी विवाहांमध्ये वाढ
कोरोनाकाळात दिलासादायक गोष्ट म्हणजे निर्बंधामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लागली आहे.
यवतमाळ : कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. याचा फटका मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र, यात दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोना काळातील निर्बंधामुळे लग्नकार्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लागली आहे. त्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच असल्याने आता जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभसाठी केवळ 35 लोकांची परवानगी दिली असली तरी आता बरीच मंडळी बडेजाव पद्धतीने लग्न न करता साध्या सोप्या पद्धतीने लग्न लावताना दिसून येत आहे.
लग्नामध्ये खर्च कमी करण्यासाठी सहदुय्यम निबंधक कार्यालयात येऊन नवदाम्पत्य विवाह नोंदणी करीत आहेत. केवळ 200 ते 250 रुपयात लग्न होतंय. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत सोप्या पद्धतीने विवाह होत असल्याने आता नागरिकांचा कल लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात या विवाह पद्धतीकडे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लग्नकार्यात अनेक मंडळी लग्नकार्यातील तामझामवर पाण्यासारखा पैशाचा खर्च करतात. त्यात आता कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 35 लोकांची मर्यादा लग्नकार्यासाठी निश्चित केली आहे. अशावेळी आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्ट लग्न आणि त्याच लग्नकार्यासाठी सोप्या आणि कमी खर्चात विवाह करण्यासाठी अनेक मंडळी विवाह नोंदणी कार्यालयात येऊन लग्न लावत आहेत. यात वर-वधू आणि तीन साक्षीदार एवढ्या लोकांची गरज असते. एक महिन्यापूर्वी नोंदणी करायची आणि त्यानंतर 30 दिवसांनी जोडप्याला लग्न करता येते, तेही अगदी 200 ते 250 रुपयात. त्यामुळे या नोंदणी विवाह पद्धतीने लग्न करण्यासाठी आता नागरिकांचा कल वाढला आहे.
विवाह नोंदणी पद्धतीने केल्याने लाखोंचा खर्च फक्त काही रुपयांवर आला आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती या विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी येत आहेत. लग्न करणारे उपवर वर आणि वधू सोबत तीन साक्षीदार एवढ्याच लोकात लग्न लागते. या लग्न पद्धीतीने खर्चात बचत होत असून बरेच पालक लग्नकार्यात होणाऱ्या वारेमाप खर्चात बचत होत असल्याने तेच पैसे याच नावदाम्पत्याला भविष्यासाठी मदत म्हणून देत आहेत. त्यामुळे आता नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी कल वाढला असल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी वसंत कळंबे यांनी दिली.
दिव्यांगांचे लग्न
अमरावती येथील राजेश बोरकर आणि यवतमाळच्या कामठवाडा गावची मंगला श्रीरामे या दोघांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले असून राजेश अमरावती येथील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतोय. या जोडप्याचे याच सोप्या पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थितमध्ये लग्न लागले. विशेष म्हणजे हे नवविवाहित दाम्पत्य दिव्यांग म्हणजे जन्मतः बोलता न येणारे वर-वधू असल्याने त्यांच्या पालकांच्या साक्षीने हे लग्न लागले.
नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली
यवतमाळ जिल्ह्यात सन 2018 ते 19 मध्ये 280 नोंदणी पद्धतीने लग्न लागले. तर सन 2019 ते 20 मध्ये 305 नोंदणी पद्धतीने लग्न झाली असून कोरोनाच्या उद्रेकानंतर मे 2020 ते 10 मार्च 2021 पर्यंत 303 लग्न विवाह नोंदणी पद्धतीने झाली आहेत. कमी खर्चात कमी वेळेत विवाह नोंदणी कार्यालयात लग्न होत असल्याने या पद्धतीने लग्न करणाऱ्या व्यक्तीची संख्या कोरोनाच्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाढताना दिसत आहे.