मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही तासात कांजूरमार्ग येथे कारशेडच्या कामाला सुरुवात, पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आरे येथे होणारे प्रस्तावित कारशेड हे कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे याठिकाणी माती परीक्षणाला सुरुवात देखील झाली आहे.
याबाबत बोलताना पर्यावरणप्रेमी डी. स्टॅलिन म्हणाले की आज आमच्या 7 वर्षाच्या संघर्षाला यश आलेलं आहे. मागच्या सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मेट्रोचं कारशेड आरे येथे न करता कांजूरमार्ग येथे करा अशी आम्ही विनंती करत होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आमचं न ऐकता कारशेड आरे येथेचं होणार असल्याचं जाहीर केलं आणि हजारो झाडे देखील तोडली. याविरोधात ज्या पर्यावरण प्रेमींनी आंदोलनं केली त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले परंतु सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड येथे नेत असल्याचं जाहीर करताना आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेतं असल्याचं देखील जाहीर केलं. त्यामुळे या आंदोलनात काम करणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमींसाठी आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधताना म्हणाले की, गेले अनेक महिने आरे येथील मेट्रो कारशेड नेमकं कुठं हलवलं जाणार याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. परंतु अखेर आज ते कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जागेत आम्ही हालवत आहोत. त्यासाठी सरकारला शून्य रुपये खर्च आहे. कारण ही शासकीय जागा आहे.' तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला जेव्हा आरेमध्ये कारशेड उभारण्याची घोषणा केली होती तेव्हा शिवसेनेने त्याला जोरदार विरोध केला होता. आणि आम्ही त्यावेळी घोषणा देखील केली होती की, ज्यावेळी राज्यात शिवसेनेचं सरकार येईल त्यावेळी आम्ही हे कारशेड दुसरीकडे हलवू आणि त्यानुसार आज निर्णय जाहीर केला आहे. एकंदरीत आजच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवून भाजपला एक प्रकारे शहच दिला आहे.