(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown Effect | परराज्यात पायी निघालेल्या 55 वर्षीय व्यक्ती मृत्यू, भंडाऱ्यातील घटना
चंद्रपूरहून मध्य प्रदेशात पायी निघालेल्या 55 वर्षीय व्यक्तीच मृत्यू झाला आहे. सतत चालल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील घटना आहे.
भंडारा : संचारबंदीदरम्यान जीव वाचवण्यासाठी सुरू केलेला पायी प्रवास अखेर एका व्यक्तीच्या जीवावर उठला. चंद्रपूर जिल्ह्यातून मध्यप्रदेशला गावी पायी निघालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा सतत चालून थकल्याने, अशक्तपणाने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील प्रवासी निवाऱ्यात घडली आहे. धर्मपाल दुबे असं मृत प्रवाशाचे नाव आहे.
मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील अतरी गावात राहणारा धर्मपाल दुबे पोटाची खळगी भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही गावात मजूर म्हणून आला होता. मात्र संचारबंदी झाल्यानंतर दोन वेळच्या जेवणाचीही अडचण भासू लागली. दररोज निर्माण होत असलेल्या अडचणींमुळे गावी जाण्याचा निर्णय त्याने घेतला.
धर्मपाल, त्याचा मुलगा सून आणि तीन वर्षाची नात तसेच गावातील इतर 6 सहकारी यांनी सिंदेवाहीवरून मध्यप्रदेशला जाण्यासाठी पायीच प्रवास सुरु केला. सेंदुरवाफा येथे पोहोचल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सर्व जण पुढचा प्रवास करण्यासाठी उठले मात्र धर्मपाल झोपूनच राहिला. शेवटी डॉक्टरांना बोलावून त्यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संचारबंदीच्या काळात जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर पायी जावे लागल्याने धर्मपालचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनंतर धर्मपालचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्याच्या गावी पाठवण्यात आला. अशी पायपीट करणारे अनेक जण देशभर आहेत. जिथे असाल तिथे थांबा असं वारंवार सरकारकडून आवाहन केलं जात आहे. मात्र लोक भीतीपोटी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आपला पायी प्रवास सुरु ठेवत जीव धोक्यात घालत आहेत.
संबंधित बातम्या
- डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- Face Mask | वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास मोठा धोका; तज्ज्ञांकडून इशारा
- 9 मिनिटं घरातील केवळ दिवेच बंद करायचे; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण
- केशरी कार्डधारकांनाही कमी किंमतीत धान्य मिळणार, सवलतीच्या दरात धान्य दिल्याने राज्य सरकारवर 300 कोटींचा बोजा