प्रस्ताव नाकारल्यानंतरही हातमिळवणीसाठी एमआयएमकडून प्रयत्न सुरुच, जलील म्हणाले, हे एक मिशन...
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकमुखानं एमआयएमशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतरही इम्तियाज जलील यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत..
औरंगाबाद : महाविकास आघाडीशी (Maha Vikas Aghadi) हातमिळवणी करण्याचा एमआयएमचा (AAMIM) प्रस्ताव शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं (NCP, Congress, Shiv Sena) फेटाळून लावला. त्यानंतर आता एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आघाडी करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकमुखानं एमआयएमशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतरही इम्तियाज जलील यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत.
जलील म्हणाले की, आपण जे करणार आहोत ते भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी आहोत. आधी तुम्ही आम्हाला म्हणायचे की आम्ही भाजपला लपून मदत करतो. आता आम्ही तुमच्याकडे येत आहोत तर तुम्ही आता दूर करत आहात. हे दुर्दैवी आहे. भाजपकडे सर्व यंत्रणा हातात आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. सर्वांनी एकत्रपणे येऊन भाजपचा विरोध केला पाहिजे. त्यामुळं आम्ही हा प्रयत्न केला. पुढेही आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असं ते म्हणाले.
जलील म्हणाले की,समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर करायचं आहे. राजकारण दुय्यम असतं. देश आधी असतो, त्यासाठी आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया वाचली. शिवसेना आज असं बोलत आहे हे पाहून वाईट वाटलं. शिवसेना सतत म्हणते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण त्यांच्या सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला असं वाटतंय का की आपण कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत आहोत? असा सवाल देखील जलील यांनी केला.
जलील म्हणाले की, आज शिवसेना सुधारली आहे. त्यांनी आपले स्टॅंड चेंज केला आहे. हे एक मिशन आहे, यात आम्हाला किती यश मिळतं हे पाहू, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे की, सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Shivsena : शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून एमआयएमला सुपारी; राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
CM Uddhav Thackeray : हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश