राज्यात उद्यापासून चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता
Unseasonal Rain: 15 मार्च रोजी जळगाव, नाशिक, धुळे तर 16 मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी असून भारतीय हवामान विभागाने उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून यात धुळे, जळगाव आणि नाशकात काही ठिकाणी 15 मार्च रोजी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 16 आणि 17 मार्च रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर आज 37.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून तापमानात घट दिसण्याची शक्यता आहे. दोन ते चार अंश सेल्सिअसने कमाल तापमानात घट नोंदवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता,
15 मार्च : जळगाव, नाशिक, धुळे
16 मार्च : जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
17 मार्च : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ
अंदाज
कोकणात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 14 ते 16 मार्च, दरम्यान पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाजीपाला, फळे आणि रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. वादळी वाऱ्यामुळे नवीन लागवड केलेली फळांची झाडे तुटून पडण्याची शक्यता असते.
मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजावर संकट कोसळले आहे. त्यातच हवामानतज्ज्ञांनी 17 मार्चपर्यंत, पुढचे चार दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी विजा, गडगडाटीसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. विशेषतः 15 ते 17 मार्चच्या दरम्यान वातावरणाची तीव्रता अधिक जाणवते.
या काळात दिवसाच्या कमाल तापमानातही 2 अंशांनी घट होण्याची शक्यता जाणवते. जमिनीपासून साधारण 3 ते 7.5 किमी अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशापासून उत्तर प्रदेशापर्यंत त्या पातळीतून जाणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी आणि बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे इतर राज्याबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.