IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा पाय खोलात, दिल्ली क्राईम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी करणे, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली दिल्ली क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल केला आहे.
![IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा पाय खोलात, दिल्ली क्राईम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला IAS Pooja Khedkar case delhi crime branch filled fir complaint against her of forgery cheating disability certificate act marathi update IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा पाय खोलात, दिल्ली क्राईम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/19/6035245948c179c6ca169cc036940b48172139607816593_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. यूपीएससीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रँचने (Delhi Crime Branch) पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकरांच्या प्रकरणात आता दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करणार असल्याने खेडकरांचा पाय आणखी खोलात चालल्याची स्थिती आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही त्यांनी काढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यूपीएससीची कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, पूजा खेडकरांचा राज्यातील प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून 23 जुलै पर्यंत त्यांना मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यूपीएससीने त्यांना एक कारणे दाखवा नोटिसही बजावली असून त्यामध्ये खोटे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी कारवाई का करू नये असा सवाल विचारला आहे.
पुणे पोलिसांची दुसरी नोटीस
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. या आरोपांसदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटलांनी वाशिम विश्रामगृहावर जाऊन खेडकरांना नोटीस दिली. पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळं आज दुसरी नोटीस देण्यात आली आहे.
पूजा खेडकरांनी वाशिम सोडलं
तब्बल 72 तासांनी पूजा खेडकर यांनी वाशिमचं शासकीय विश्रामगृह सोडलं आहे. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्या चौकशीला पूजा अद्याप हजर राहिलेल्या नाहीत. वाशिमचं शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर पूजा खेडकर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे. माध्यमांच्या प्रश्नांनाही पूजा खेडकर यांनी सविस्तर उत्तर देणं टाळलं.
पूजा खेडकरांचे बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशनकार्ड एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. याच रेशनकार्डच्या आधारे पूजा खेडकरांनी पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे त्यांना डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं.
पुढं याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले होते. अशातच हे प्रमाणपत्र योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झाला असताना खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती लागेलेलं आहे. थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देत, इथं खेडकर कुटुंबीय रहिवाशी असल्याचं या रेशनकार्डच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)