शरद पवार-सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये; रामदास आठवलेंचं आवाहन
भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अमान्य होत असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करु शकते, याच्या शक्यता बळावल्या आहेत. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अमान्य होत असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करु शकते, याच्या शक्यता बळावल्या आहेत. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रामदास आठवले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. तसे केल्यास हा आत्मघातकी निर्णय ठरले. तसेच मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना आवाहन करेन की, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये.
आठवले म्हणाले की, राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुतीसाठी मतदान केलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. त्यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये.
आठवले म्हणाले की, शिवसेनेने त्यांची आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणं थांबवावं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावं. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्यााला उपमुख्यमंत्रीपद असा होतो.
दरम्यान, जरी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केलं तरी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.
पाहा काय म्हणाले रामदास आठवले?