सेलिब्रिटी, राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड्स कसे मिळतात? वडील गमावलेल्या तरुणीचा संतप्त सवाल
नाशिकमधल्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणाऱ्या या तरुणीची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. रश्मी पवार नावाच्या मुलीच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी करावी लागलेली वणवण, हॉस्पिटल्सची चालणारी मनमानी हे तिने पोस्टमध्ये मांडलं आहे.
नाशिक : देशासह जगावर आलेल्या कोरोना संकटात अनेकांना चांगले-वाईट अनुभव आले. कुठे माणुसकीचं दर्शन घडलं तर कुठे माणुसकी उरली आहे की नाही हे विचारण्याची वेळ आली. डॉक्टर, नर्स यांच्यासह आरोग्य कर्मचारी दिवसरात्र एकत्र करुन काम करत होते. मात्र काही ठिकाणी अपुऱ्या यंत्रणेमुळे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. अशीच एक घटना नाशिकमधील तरुणीसोबत घडली. नाशिकमधल्या आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणाऱ्या या तरुणीची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
रश्मी पवार नावाच्या या मुलीच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. मात्र ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी करावी लागलेली वणवण, हॉस्पिटल्सची चालणारी मनमानी हे सगळ त्यांच्या कुटुंबाला कसं सहन करावे लागले हे तिने या फेसबुक पोस्टमध्ये मांडलं आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्यांना बेड्स मिळत नाहीत पण सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात? असा संतप्त प्रश्न या मुलीने विचारला आहे.
नाशिकमध्येही व्हेंटिलेटर धूळखात पंतप्रधान केअर फंडातून नाशिकला मिळालेले 15 व्हेंटिलेटर धूळखात असल्याचं एबीपी माझाने काही दिवसांपूर्वीच समोर आणलं होतं. ज्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे तशी टाकी उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटरचा वापर झालेला नाही.
रश्मी पवारची फेसबुक पोस्ट
आमचा कोरोनाचा अनुभव...!!
ह्याला 'अनुभव' म्हणावं की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे,कारण एका मुलीसाठी तिचा बाबा हे जग कायमचा सोडून जाणं ह्यापेक्षा कठीण अजून काय असू शकतं आयुष्यात..
माझ्यासारखे कित्येक जण आहेत आज बाहेर जे त्यांच्या वडिलांसाठी वणवण फिरताय..केवळ १ ICU बेड मिळावा म्हणून...बाहेर प्रचंड कठीण परिस्थिती आहे कोरोना रुग्णांची.. कुठे hospitals ची दयनीय अवस्थाVentilators चा तुटवडा, कुठे जागा असून सुद्धा रूग्णांना भरती करून देण्यास नकार, कुठे hospitals चे भरमसाठ आणि न परवडू शकणारे खर्च आणि अजून बरंच..
रूग्णाच्या मृत्यूनंतरही शरिराचे हाल होताहेत.. नाशिकच्या अमरधाममध्ये विद्युत दाहीनीसाठी सुध्दा 'वेटींग' आहे १०-१० तासांचं.. असं सगळं होत असून सुध्दा प्रशासन जागं का होत नाहीये हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा नाशिकमध्ये फक्त १२ रूग्ण होते तेव्हा lockdown होतं आणि आता जेव्हा दिवसाला १००० च्या पटीत रूग्ण संख्या वाढतेय तेव्हा सताड सगळं सुरू केलंय आणि लोकंही पिसाळल्यासारखी वागताय...
जोपर्यंत कोरोना आपल्या घरात येत नाही,तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही... तो घरात येण्याची वाट बघू नका... वेळीच सावध व्हा...
किमान आतातरी प्रशासनाला जाग यावी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे हिच अपेक्षा...
-रश्मी पवार (नाशिक)
youtube link:
त्यामुळे फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या सुस्त प्रशासन आणि सरकारला ही पोस्ट बघून तरी जाग येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.