एक्स्प्लोर
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला गृहराज्यमंत्रीपद

मुंबई: दिवसभराच्या चर्चा, खलबतांनंतर अखेर शिवसेनेनं गृहराज्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला गृहराज्यमंत्री पद मिळणार आहे. शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची गृहराज्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. तर भाजपच्या राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच सुभाष देशमुख यांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दुसरीकडे भाजपतही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं महसूल खातं हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे जाणार असल्याचं समजतं आहे. याचप्रमाणे सेनेच्या मंत्र्यांकडेही काही महत्त्वपूर्ण खाती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेकडून उत्तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील आणि मराठवाड्यातील अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली आहे. थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी खोतकर आणि पाटील यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली. मात्र केंद्रात भाजपनं मंत्रिपद नाकारल्यानंतर राज्यात आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी आशा शिवसेनेला होती. मात्र ती फोल ठरताना दिसते आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या बैठकीलाही शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी लावली नाही. उद्या थेट शपथविधीलाच सेनेचे नेते आणि मंत्री उपस्थित राहतील. त्याआधी संभाजी निलंगेकर पाटील, जयकुमार रावळ, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासह इतर नेत्यांनी वर्षावर हजेरी लावली. उद्या सकाळी 9 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
कोल्हापूर
महाराष्ट्र





















