मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; राज्यभरात ढगाळ वातावरण, रब्बी पिकं संकटात
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात ढगाळ वातावरणासह पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मराठवाडा, कोकणातील अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं ढगाळ हवामान होतं. त्यानंतर अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अशातच वातावरणातील बदलांमुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारीही ढगाळ नोंदविण्यात आलं. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसांत निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
पुण्यातही अनेक भागांत ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोल्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तर साताऱ्यातही पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळालं. रायगडमधील उरण परिसराती अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याशिवाय माणगाव, अलिबागमध्येही अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
परभणीत मध्यम स्वरुपाचा पाऊस
परभणीत पहाटेपासुन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून मागच्या आठवड्यापर्यंत परभणी जिल्ह्यात तापमान हे 8 अंशपर्यंत घसरून कडाक्याची थंडी पडली होती. मात्र आज पहाटेपासूनच जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. त्यामुळे भर हिवाळ्यात परभणीकरांना पावसाळ्याचा अनुभव मिळत आहे. परंतु सतत असलेलं आभाळ आणि पाऊस यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळं बळीराजा चिंतेत
वातावरणातील बदलांमुळे हिवाळ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांवर संकट निर्माण झालं आहे. तसेच अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळेही शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. निसर्गाचा हा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात झालेल्या या वातावरण बदलांमुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. हिवाळ्यातील रबी पिंकांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
ऐन थंडीच्या मोसमात पावसानं हजेरी लावल्यामुळे सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. नेटकरी थंडीच्या मोसमात पडणाऱ्या या पावसावर भन्नाट मीम्स शेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात हिवाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे झालेले वातावरणातील बदल मात्र चिंतेचा विषय ठरत आहेत.