सावधान! सोयाबीन उडीद झाकून ठेवा, आजपासून पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागात कधीपर्यंत पडणार पाऊस?
परतीचा पाऊस आणखी किती दिवस राहणार? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झालीय, त्या भागात शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हा परतीचा पाऊस आणखी किती दिवस राहणार? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पंजबराव डख यांनी शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे किंवा केला आहे, त्या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या या पिकांच्या काढणी सुरु आहेत. अशातच पाऊस आल्यास शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
या भागात होणार जोरदार पाऊस
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12 ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार असल्याचे डख म्हणाले. 12 ते 16 ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डखांमनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, परभणी,स हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे.
गहू आणि हरभरा पिकांसाठी परतीचा पाऊस ठरणार वरदान
दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. हा परतीचा पाऊस दोन पिकांसाठी फायदेशीर असल्याचे डख म्हणाले. मात्र, दुसऱ्या बाजूला परतीच्या पावसाची अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीन, उडीद, भाजीपाला, तूर, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे.
महत्वाच्या बातम्या: