मुंबईसह कोकणात यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; हवामान खात्याची माहिती
मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे.

मुंबई : मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे. मात्र यंदा उन्हाळ्यात हा उकाडा सहन करावा लागणार आहे. कारण मुंबईसह कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र असणार असल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.
सरासरी मुंबईतील तापमान हे 33 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. यात मात्र 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान 2 अंश सेल्सिअसपर्यंत अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे. तीव्र तापमानामुळे ह्या उन्हाळ्यात जास्त उकाडा जाणवणार आहे.
मुंबईत मागील दोन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. काल मुंबईचा पारा 38.1 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता. दरवर्षी मुंबईतील तापमान 33 अंश सेल्सिअस असतं मात्र यात काल तब्बल 5.2 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आजही तापमान हे 38 अंश सेल्सिअसपर्यंत बघायला मिळेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मार्च महिना लागताच कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा वाढल्याचं बघायला मिळत आहे.
कोकणातही उन्हाचा कडाका जाणावणार
मुंबईसह कोकणात 5 ते 11 मार्चपर्यंत पारा नेहमीपेक्षा अधिक असणार आहे. ज्यात सरासरी २ अंश सेल्सिअस वाढ होणार आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आद्रताही वाढली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना उकाडा जाणवत आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई कोकण विभागात हवामान विभाग विभागलं गेलं आहे. त्याअंतर्गत मुंबईसह कोकण भागात ह्या सीजनमध्ये उन्हाळा सामान्यपेक्षा अधिक तीव्र असेल. नेहमीपेक्षा 70 टक्के उष्ण वातावरण ह्या सीजनमध्ये राहण्याचा अंदाज आहे. मुंबईकर उन्हापासून वाचवण्यासाठी उपाय करताना पाहायला मिळत आहेत. वाढत्या उकड्यामुळे थंड पेयांच्या गाड्यांवर गर्दी होत असल्याचं चित्र आहे. पुढील 2-4 दिवस मुंबईत उकाडा कायम असणार असल्याचंही सांगितलं जातं आहे.
हिट अलर्ट...
राजस्थान आणि गुजरातमधून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वाढ झाली आहे. अकोला आणि चंद्रपूररमध्ये हिट अलर्ट देण्यात आला आहे. हिवाळा संपताच लगेच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान असं असले तरी काळजीचं कारण नसून आवश्यक त्या उपाययोजना नागरिकांनी कराव्यात. त्याचसोबत उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली, आणि उन्हापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.




















