नारायण राणेंना हायकोर्टाचा आणखी एक दिलासा; 'या' प्रकरणात मिळाला अटकेपासून अंतरीम दिलासा
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाचा दिलासा. धुळे इथं दाखल एफआयआर प्रकरणी तूर्तास अटकेपासून अंतरीम दिलासा
Narayan Rane : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना हायकोर्टानं दोन आठवड्यांचा अंतरिम दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत राणेंनी हायकोर्टात याचिका केली आहे. मात्र राणेंवर तूर्तास कोणतीही कारवाई करणार नाही याची हमी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केली. तेव्हा न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं पुढचे दोन आठवडे नारायण राणेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
धुळे इथं दाखल गुन्ह्यात सीआरपीसी कलम 41(अ) अंतर्गत पोलिसांनी 10 मार्च रोजी नोटीस बजावल्यानं नारायण राणे यांनी याप्रकरणी दाखल इतर गुन्ह्यांप्रमाणे हा गुन्हादेखील रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात अर्ज याचिका दाखल केली आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकाच प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला आहेत. त्यामुळे प्रत्येक एफआयआरला स्वतंत्र याचिकेतून आव्हान देण्यात आलं तर बरं होईल, जेणेकरून याचिकाकर्त्यांनाही त्या-त्या पोलीस ठाण्यातून सुचना आणि माहिती घेणे सोयीस्कर ठरेल, असे हायकोर्टानं यापूर्वीच याचिकाकर्त्यांना सांगितलं आहे.
भाजपनं गेल्यावर्षी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रेतील महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर बोलताना, "मी असतो तर त्यांच्या कानशिलातच वाजवली असती" असे आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. त्या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पदसाद उमटले आणि राणेंविरोधात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात धुळ्यासह पुणे, ठाणे, नाशिक, महाड, जळगाव आणि अहमदनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500, 505(2), 153 ब (1)(क) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :