एक्स्प्लोर
'माझा राजीनामा मंजूर करा,' हर्षवर्धन जाधव यांची वृत्तपत्रात जाहिरात
मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन, असा इशार हर्षवर्धन जाधव दिला होता. त्यानंतर 25 जुलै रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला.
औरंगाबाद : औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिली आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात आहे. शिवराज्य बहुजन पक्ष या आपल्या पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन, असा इशार हर्षवर्धन जाधव दिला होता. त्यानंतर 25 जुलै रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला.
मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आंदोलन नको आता 1 डिसेंबरला जल्लोष करा, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरही हर्षवर्धन जाधव यांनी आक्षेप नोंदवला आहे. फक्त राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरत असल्याचंही वृत्तपत्राच्या जाहिरातीत म्हटलं आहे.
हर्षवर्धन जाधव म्हणतात की, "मराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचं कर्तव्य तुमच्या हातात होती, त्यात तुम्ही दिरंगाई केली. त्यामुळे बरीच कोवळी मुलं आत्महत्येकडे वळली. या कारणांमुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो."
शिवसेनेशी काहीही संबंध नाही
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून आक्रमक झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही, असं सांगत शिवराज्य बहुजन पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली. पक्ष म्हणून शिवसेना काय करेल, ते ठरवतील पण आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी मला मराठा आरक्षणावर बोलू नका असं सांगितल्याची धक्कादायक माहितीही हर्षवर्धन जाधव यांनी दिली होती.
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. विविध वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली होती. हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनसेतून केली. ते मनसेचे आमदार होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement