Hari Narke : तुमच्यात धमक असेल तर...; प्रा. हरी नरकेंच्या मृत्यूनंतर ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रमिती नरकेचं सनसणीत उत्तर
Hari Narke Death : प्रा. हरी नरके यांच्यावर टीका करण्यासाठी काहीतरी वैचारिक वारसा लागतो, तशी वैचारिक धमक असेल तर त्यांच्यावर टीका करा असं उत्तर अभिनेत्री प्रमिती नरके यांनी दिलं आहे.
मुंबई : प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचं बुधवारी 9 ऑगस्टला निधन झालं आणि त्यानंतर सोशल मीडियात विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट लिहिल्या. याला आता प्रा. हरी नरके यांची मुलगी अभिनेत्री प्रमिती नरकेने सणसणीत उत्तर दिलं आहे. आयुष्यभर त्या व्यक्तीने फक्त स्वतःच्या विचारांनी तुमच्या विचारांचं खंडन केलं. आज तुमच्यात धमक असेल तर तुमच्या विचारांनी त्यांचं खंडन करा. ती धमक मिळवलीत तर टीका करा असं त्या म्हणाल्या. मुंबईत भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजीत शोक सभेवेळी प्रमिती शिंदे बोलतं होती. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, मंत्री छगन भुजबळ, राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रमिती नरके म्हणाल्या की, "प्रा. हरी नरके यांच्यावर टीका तर करूच शकत नाहीत, कारण ती करण्यासाठी काहीतरी वैचारिक वारसा लागतो. लहानपणापासून त्याने मला बाबा म्हणायची सवय लावली. अहो जाओ नाही. बाबा नोकरी करत असताना दौरे करायचा, कार्यक्रम करायचा आणि मला तो जवळजवळ चार महिन्यांनी भेटायचा. मला त्याने वाचनाची सवय लावली, जी त्याला होतीच. ती त्याने माझ्यातही रुजवली."
प्रा. हरी नरके यांच्या आठवणींबद्दल सांगताना प्रमिती नरके पुढे म्हणाल्या की, "तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला. मला जे करायचंय ते करू दिलं. मी ललित कला केंद्रात प्रवेश घेतला तेव्हा आरक्षण वापरायचं नाही अशी सक्त ताकीद त्याने दिली होती. मी ते न वापरता प्रवेश मिळवला. मी अभिनयात करिअर करायचं असं सांगितल्यावर तो घाबरला होता, पण त्याने मला कधीच काही जाणवू दिलं नाही."
राज्याचे मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या निधनाने माझा वैचारिक आधारस्तंभ हरपला आहे. हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ.
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथ संपदा सुमारे 25 हजारांहून अधिक संपदा एकत्र करून वांद्रे येथील एमईटी भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा. हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच दरवर्षी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शोध पत्रकारिता, गरीब विद्यार्थी, फुले, शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या समाजसुधारक आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ता यांच्यासाठी एकत्रितपणे हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा केली.
यावेळी बोलताना एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, "गेली 35 वर्ष आमची मैत्री होती. पत्रकारितेत मला महात्मा फुले यांच्या बातमीने प्रसिद्धी दिली, त्यामागे प्रा.हरी नरके याचं संशोधन होत. संशोधन क्षेत्रात त्यांनी अतिशय कष्ट करून अनेक संशोधने, सत्य त्यांनी समाजापर्यंत पोहचविले. आपल्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. समाजाला आणि देशाला वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केल. प्रा. हरी नरके यांच्या निधनाने समाजाची महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे."
ही बातमी वाचा: