Happy New Year : नववर्षाच्या स्वागताला मंदिरं सजली, कोल्हापूर, शिर्डी, शेगाव, पंढरीसह ठिकठिकाणी गर्दी
नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी, पंढरपूर, शेगावमधील मंदिरात भाविकांनी गर्दी केली.
मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी, पंढरपूर, शेगावमधील मंदिरात भाविकांनी गर्दी केली. या निमित्तानं मंदिरं देखील आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आली होती. कालपासूनच शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली असून कालपर्यंत 48 तासात तब्बल 50 हजार भाविकांनी साईदर्शन घेतले. रोज 15 हजार भाविकांना दर्शन देण्याची घोषणा संस्थानने केली असली तरी गेल्या दोन दिवसात प्रत्यक्षात रोज 22 हजाराहून अधिक भाविकांनी साईदर्शन घेतलंय. इकडे पंढरपुरात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताला विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलंय. विठ्ठल गाभाऱ्यात जाताना वारकरी संप्रदायाची वाद्ये असलेली टाळं, पखवाज, तबला, चिपळ्या, वीणा ही वाद्ये साकारली आहेत.
साईनगरीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले नववर्षाला सुरुवात होताच शिर्डीत देशभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. अनेक महिन्यानंतर साईनगरीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असून वातावरण भक्तीमय झालंय. कोरोनाचे बंधन जरी असले तरी मात्र साईबाबांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डीत हजेरी लावली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रभर मंदिर खुले करण्यात आले होते आणि आता दुपार होताच भाविकांची गर्दी उसळली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताला विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलंय. विठ्ठल गाभाऱ्यात जाताना वारकरी संप्रदायाची वाद्ये असलेली टाळं, पखवाज, तबला, चिपळ्या, वीणा ही वाद्ये साकारली आहेत. सरते वर्षांनी वारकरी संप्रदायाला खूप वेदनादायी आठवणी दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटाने त्यांचे आराध्य असलेला विठुराया तब्बल 8 महिने कुलूपबंद अवस्थेत होता. वारकऱ्यांच्या आषाढी कार्तिकी सारखे सोहळे होऊ शकले नव्हते. आता या कटू आठवणी देणारे 2020 हे साल जाऊन येणाऱ्या 2021 या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून आळंदी येथील भाविक प्रकाश ठाकूर यांनी विविध प्रकारच्या 1 टन फुलांनी विठ्ठल मंदिर अतिशय कल्पकतेने आकर्षक पद्धतीने सजवले आहे.
शेगावात संत गजानन महाराजांच्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वगातासाठी शेगावात संत गजानन महाराजांच्या भक्तांनी आज दर्शनासाठी गर्दी केली. मुंबई , नाशिक, पुणे तसंच गुजरात , मध्यप्रदेशातून भाविक आज शेगावात आले आहेत. दररोज फक्त 9 हजार ई पास धारक भाविकानाच दर्शनाचा लाभ मिळत असल्याने अनेक भाविकांचा पास न मिळाल्याने हिरमोड होतोय. पुढील तीन दिवस गजानन महाराजांच दर्शन पास हाउसफुल झाले आहेत.
आई अंबाबाई गेल्या वर्षासारखं संकट तेवढं येऊ देऊ नको करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी कोल्हापुरात राज्यभरातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली केली आहे. 2020 साल आपल्या सगळ्यांसाठीच खूप संकटाचे गेले आहे. मात्र 2021वर्ष हे सुखा-समाधानाचे आणि आनंदाचं, आरोग्यदायी जावो यासाठी वर्षाची सुरुवात अंबाबाई देवीच्या दर्शनाने केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी मंदिर खुले केले आहे. कोरोनाच्या संकटात अंबाबाईचं मंदिर सकाळी आणि संध्याकाळी सुरू होते. आता मात्र अंबाबाई मंदिर पूर्ण दिवसभर सुरू आहे. त्यामुळे इतर शहर आणि राज्यातून आलेल्या भाविकांना देखील देवीचे दर्शन सहजपणे घेता येत आहे. 2020 साल आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संकटमय गेलं आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले, संसार रस्त्यावर येण्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. आता आलेल्या वर्षात अशी संकटं येऊ नयेत. सगळ्यांचे आरोग्य चांगले राहो. अशा पद्धतीचे साकडे भाविकांनी देवीला घातले.कोरोना संकट सुरू झाल्यापासून करवीर निवासिनी अंबाबाईचे महाद्वार बंद करण्यात आले होते त्या ठिकाणाहूनच भाविक देवीचे दर्शन घेत होते सरकारने मंदिर दर्शनासाठी खुले केल्यानंतर पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर सोडलं जातं. आज पासून महाद्वारातून देवीचं मुख दर्शन घेता येणार आहे. साधारण दिवसाला 12 ते 15 हजार भाविक देवीचं दर्शन घेतात.