Hanuman birthplace controversy : ना अंजनेरी.. ना किष्किंधा, हनुमंताचं जन्मस्थान करमाळा तालुक्यातील कुगाव? नवीन दावा समोर
Hanuman birthplace controversy : सोलापूर जिल्ह्यातील महंत आणि अभ्यासकांनी 'कुगाव' हेच हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचा दावा केल्याने हा वाद अजून वाढत जाणार असल्याचं चित्र दिसतंय.
Hanuman Birthplace Controversy : सध्या हनुमंताच्या जन्मस्थानाचा वाद काही थांबता थांबत नसताना आता सोलापूर जिल्ह्यातील महंत आणि अभ्यासकांनी 'कुगाव' हेच हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचा दावा केल्याने हा वाद अजून वाढत जाणार असल्याचं चित्र दिसतंय. कर्नाटकातील किष्किंधा आणि नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद सध्या सुरु झाला आहे. यासाठी नाशिक येथे नुकतीच धर्मपरिषद देखील झाली. यात हनुमंताच्या जन्मस्थळाबाबत दावा करणाऱ्यांना पुराव्यासह बोलावण्यात आले होते. मात्र महंत सीताराम बल्लाळ यांनी 'कुगाव' हेच हनुमंताचे जन्मस्थान असल्याचे पुरावे सादर केल्याने आता नेमका हनुमंतराया कोठे जन्माला? याचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होऊ लागले आहे .
पद्मपुराणवरून तयार झालेल्या भीमा माहात्म्य या ग्रंथाचा आधार
उजनीच्या जलाशयाखाली जी काही गावे बुडाली, त्यातील सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचे गाव म्हणजे कुगाव होय . याच गावाला पूर्वी कूर्म गाव म्हणत असत त्याचा अपभ्रंष पुढे कुगाव झाल्याचे सांगितले जाते . हा सर्व भाग पूर्वी सैराट चित्रपटाच्या अनेक दृश्यातून समोर आलेला आहे . याच गावात आता हनुमंताचा जन्म झाल्याचा दावा होत आहे. कुगाव या जन्मस्थळाचे पुरावे देताना बल्लाळ यांनी अतिप्राचीन पद्मपुराण वरून तयार झालेल्या भीमा माहात्म्य या ग्रंथाचा आधार घेतला आहे. भीमा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत जो प्रवास आहे, त्या काठांवरील देवस्थानांचे या ग्रंथात उल्लेख करण्यात आला आहे. या ग्रंथानुसार सिद्धटेक, नीरा नरसिंहपूर, पळसदेव, कूर्मगाव, पंढरपूर अशा सर्व देवस्थानांचे उल्लेख येतात. या ग्रंथाच्या 33 व्या अध्यायात कुगाव येथे कूर्मतीर्थ आणि हनुमंततीर्थ असल्याचा उल्लेख असून यात विष्णूचा कूर्म अवतार याच ठिकाणी झाला असून हनुमंताचा जन्म देखील याच ठिकाणी झाल्याचे पुरावे सापडत असल्याचा दावा बल्लाळ करतात .
भारतीय पुरातत्व विभागाकडून अभ्यास व्हावा
भीमा नदीच्या किनारी अंजनी माता उपासना करीत असताना घारीच्या पायातून सुटून फळ मातेच्या ओंजळीत आले आणि रुद्र अर्थात महादेवाने अंजनीच्या पोटी हनुमंत रूपाने जन्म घेतल्याचा दावा या ग्रंथाच्या आधारे बल्लाळ करतात. हेच जन्मस्थान असल्याचा दावा करताना उजनीच्या जलाशयात बुडालेल्या पुरातन हनुमंताच्या हेमाडपंथी मंदिराची काही दगडे आणून तीच पुरातन मूर्ती या नवीन मंदिरात स्थापन केल्याचे ते सांगतात. या मंदिरात एक पुरातन शिलालेख देखील असून त्याचाही भारतीय पुरातत्व विभागाकडून अभ्यास व्हावा अशी मागणी कुगाव ग्रामस्थ दयानंद कोकरे करतात . कुगाव येथे गेल्या वर्षानुवर्षे हनुमानाचा जन्मउत्सव एक दिवस आधी साजरा होत असल्याचे बल्लाळ सांगतात .
तीनही ठिकाणचे दावे तपासून सत्य उजेडात आणावे
पुरातन पुरावे, ग्रंथ याचा आधार घेऊनच यातून योग्य तोडगा निघणार असून सर्व पुरावे आपण नाशिक येथे झालेल्या धर्मपरिषदेत सादर केल्याचे बल्लाळ यांनी सांगितले . या धर्मपरिषदेमध्ये तसे कोणतेही नियम पळाले गेले नसल्याची खंत व्यक्त करताना आम्हाला कोणत्याही निधी अथवा मदतीसाठी कुगाव हे जन्मस्थळ असल्याची मागणी करायची नसून हेच हनुमंताचे जन्मस्थळ असल्याने आता भारतीय पुरातत्व विभागाने तीनही ठिकाणचे दावे तपासून सत्य उजेडात आणावे असे कुगाव ग्रामस्थांचे मागणे आहे .