Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, ठाण्यातील आनंद आश्रमात आनंद दिघेंनाही वंदन
Guru Purnima 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
मुंबई : आज गुरुपौर्णिमा.... गुरुवंदनाच्या आजच्या दिवसाला शिवसेनेत खास महत्त्व आहे. त्यातच यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडानंतरची आजची पहिली गुरुपौर्णिमा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देत वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही 50 आमदार करत आहोत असंही ते म्हणाले. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आणि राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं काम आमचं युती सरकार करणार आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा उत्कर्ष करण्याचं आमचं ध्येय आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या आनंद आश्रमात जाऊन वंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ट्विट करत गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाही. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही....
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन...#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदे यांनी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं होतं. पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर दर्शनासाठी गर्दी केली.
संबंधित बातम्या :
Guru Purnima: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण!