मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक, वेळीच उपाययोजना करा; खासदार राहुल शेवाळे यांची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विनंती
देशात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यावर वेळीच उपाययोजना कराव्यात अशी विनंती एका पत्राच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच 10 वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय, या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी विविध राज्यांतील लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारी देऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
आजमितीला लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची बाब नमूद करून खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "लहान मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे."
लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य करावे असंही खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. 'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधित लहान मुलांची संख्या
महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60, 684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यातील सुमारे 9,882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत.
छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5940, 7327, 3004 आणि 2733 इतका आहे.
हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान 11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली.
महत्वाच्या बातम्या:
- Pfizer: अमेरिकेत पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer ची लस मिळणार, FDA च्या मंजुरीची शक्यता
- Sangli Lockdown: नागरिकांना भावनिक आवाहन करत जयंत पाटील यांच्याकडून सांगलीत आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय
- Kangana Ranaut Twitter Suspended: अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वादग्रस्त वक्तव्य भोवलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
