Grampanchayat Election 2021 : रत्नागिरी, सिंधुदुर्गात कुणाचं वर्चस्व? शिवसेना, भाजपची कामगिरी नेमकी कशी?
भास्कर जाधव, शेखर निकम, उदय सामंत आणि नारायण राणे यांच्या वैयक्तिक करिष्म्याकडे एका अर्थानं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पक्षांतर्गत बंडाळी, डावपेच या साऱ्याबाबी कोकणात देखील पाहायाला मिळाल्या.
रत्नागिरी : गावगाडा हाकण्यासाठी गावचा कारभारी कोण? याचा निकाल आज हाती आला. स्थानिक मुद्दे, तळागाळातील जनसंपर्क आणि आश्वासनं यांच्या जीवावार संपन्न झालेल्या निवडणुकांचे कोकणातील निकाल काय लागतात? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यात भाजपनं स्वबळावर निवडणुका लढवत थेट सेनेच्या बालेकिल्ल्यात सेनेला आव्हान देत त्याला हादरा देण्याचं चक्रव्यूह आखलं. राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे कोणातील काही गावांमध्ये देखील महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. भाजपनं दिलेलं आव्हान आणि त्यानंतर सेनेची कामगिरी त्यामुळे येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. भास्कर जाधव, शेखर निकम, उदय सामंत आणि नारायण राणे यांच्या वैयक्तिक करिष्म्याकडे एका अर्थानं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पक्षांतर्गत बंडाळी, डावपेच या साऱ्याबाबी कोकणात देखील पाहायाला मिळाल्या. जोरदार आरोप -प्रत्यारोप देखील झाले. पण, असं असलं तरी मतमोजणी मात्र शांततेत पार पडली. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता 379 पैकी शिवसेनेनं 316 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर, भाजपनं 23 ठिकाणी बाजी मारली आहे. तर, सिंधुदुर्गात 70 पैकी 43 भाजप आणि 23 जागा ग्रामपंचायती शिवसेनेनं जिंकल्या आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून झालेल्या जोरदार आरोप -प्रत्यारोप आणि दावे -प्रतिदाव्यांमुळे कोकणातील राजकीय वातावरणात एक प्रकारे गरम असल्याचं दिसून आलं.
नेमकी स्थिती काय? नेत्यांचं काम म्हणणं?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आकडेवारी पाहता त्यातील चित्र स्पष्ट होतं. पण, असं असलं तरी मंत्री उदय सामंत यांनी मात्र शिवसेनेची कामगिरी सिंधुदुर्गात उत्तम राहिली. तुम्ही यापूर्वीची कामगिरी पाहिल्यास तुम्हाला ते कळेल हे त्यांना सोदाहरण सांगितलं. त्याचवेळी निलेश राणे यांनी मात्र शिवसेनंनं पराभव मान्य करावा. कोकणातील जनतेला परिवर्तन हवं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय, भास्कर जाधव यांनी नारायण राणेंच्या राजकीय अस्तित्वाबद्दल केलेलं विधान या वादात भर घालणारं पडलं. निलेश राणे यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत थेट भास्कर जाधवांना इशारा देत राणे साहेबांबाबत परत बोलल्यास सहन करणार नाही असा इशारा दिला.
नेत्यांनी प्रतिष्ठा जपली?
ग्रामपंचायत निवडणुकीत देखील काही ग्रामपंचायती या प्रतिष्ठेच्या केल्या जातात. पक्षांतर्गत वाद देखील उफाळून येतो. अशाच काही ग्रामपंचायतींकडे लक्ष लागून राहिलं होतं. भास्कर जाधव यांच्या गुहागरमधील तुंरबव येथे काय होणार? याची चर्चा होती. पण, जाधवांनी मात्र ग्रामपंचायत राखली. सावर्ड्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर निकम यांनी ग्रामपंचायत राहिली. इकडं, संगमेश्वर तालुक्यात मात्र लोवले गावात उपतालुकाप्रमुखानं बंडखोरी करत थेट उदय सामंत यांना आव्हान दिल्याचं बोललं जात होतं. पण, याठिकाणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. साडवलीमध्ये महाविकासआघाडी विरूद्ध गावविकास आघाडी असा सामना झाला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण, याठिकाणी महाविकास आघाडीनं बाजी मारली. असं असलं तरी नावडी ग्रामपंचायतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण, 20 वर्षे ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्यानंतर ही मागील निवडणुकीत शिवसेनेकडे आली. शिवाय, या गावचा काही भाग हा शेखर निकम तर काही भाग सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात मोडत असल्यानं शेखर विरूद्ध सामंत असा सामना झाला होता. यात राष्ट्रवादीनं बाजी मारत नानिकवडी ग्रामपंचायत पुन्हा आपल्याकडे मिळवली.
शिवाय, रत्नागिरी तालुक्यातील गोळपमध्ये जुने विरूद्ध नवे शिवसैनिक असा वाद उभा राहिला होता. माजी पंचायत समिती सदस्य असलेल्या मंगेश साळवी यांनी आपलं पॅनल उभं करत सामंतांना आव्हान दिल्याचं बोललं जात होतं. पण, याठिकाणी शिवसेना पुरस्कृत 13 उमेदवार विजयी झाले. लांजा तालुक्यात मात्र शिवसेनेची कामगिरी सरस झाली. पण, राजापुरात मात्र शिवसेनेची काहीशी पिछेहाट झाल्याचं आकडेवारी पाहिल्यानंतर अंदाज बांधला जात आहे. तर, दुसरीकडे सिंधुदुर्गात भाजपनं 43 ग्रामपंचायती जिंकल्यानं शिवसेनाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. असं असलं तरी सामंत यांनी मात्र ही गोष्ट नाकारली आहे. मालवणमध्ये 6 पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता आल्यानं तो शिवसेना आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जातो. वैभववाडी तालुक्यात 13 पैकी 9 ग्रामपंचायती भाजप तर 4 शिवसेनेनं जिंकल्या आहेत. त्याच वेळी देवगड तालुक्यात 23 पैकी 17 ग्रामपंचायती भाजपनं जिंकल्यानं आमदार नितेश राणेंच्या करिष्म्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेला देवगडमध्ये केवळ 6 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. त्यामुळे एकंदरीत सारासार विचार करता कोकणातील निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. शिवाय, त्याचं विश्लेषण देखील.
संबंधित बातम्या
- Gram Panchayat Election Results 2021 | हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व, सातही जागांवर विजय
- Gram Panchayat Election Results | अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटीलच 'दादा', माळशिरसमध्येही 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर वर्चस्व
- Maharashtra Gram Panchayat Election Results | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय
- औरंगाबादमधील पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात; 25 वर्षांनंतर गावात सत्तांतर