Gram Panchayat Election | सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काही लक्षवेधी लढती होत्या. औरंगाबादमधील (Aurangabad) धोंदलगावच्या (Dhondalgaon) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुनेने आपल्या सासूचा तर जावयाने आपल्या सासऱ्याचा पराभव केला आहे.
औरंगाबाद: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा वा विधानसभेला नसते इतकी चुरस या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहायला मिळते. यातही काही लढती या लक्षवेधी असतात. कुठे भावा-भावांची लढत तर कुठे मुलगा आपल्या बापाच्या विरोधात लढतोय असे चित्र अनेक गावात पहायला मिळते. अशीच एक लक्षवेधी लढत औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात पहायला मिळाली. यामध्ये चक्क सासू विरोधात सुनेने तर सासऱ्याच्या विरोधात जावयाने निवडणुकीत उडी घेतली होती.
या निवडणुकीत सुनेने आपल्या सासूचा तर जावयाने आपल्या सासऱ्याचा पराभव केला आहे. या निकालाची चर्चा राज्यभर केली जातेय.
औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तसेच शिवशाही पॅनलकडून जावई लक्ष्मण काळे हे तर त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य हे छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी प्रत्येकाने आपापल्या विजयाचा दावा केला होता. या चौघांनीही आपण गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सांगत मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
पंढरपुरातल्या देवडेत 85 वर्षांच्या कलावती आज्जींची व्हिक्ट्री, विजयानंतर म्हणाल्या...
आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता चार दिवस सासूचे आणि सासऱ्याचे संपून चार दिवस सुनेचे आणि जावयाचे आले असल्याची चर्चा या परिसरात केली जात आहे. आता या निकालाने त्यांच्या नात्यात कडूपणा येऊ नये म्हणजे मिळवलं.