ग्रामपंचायत निवडणूक | 29, 30 डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडेंचे सर्व जात पडताळणी समित्यांना निर्देश
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता 29 व 30 डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज 29 डिसेंबर व उद्या 30 डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते, त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता 29 व 30 डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती 1 जानेवारीपर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.
राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी सुरू आहे . या निवडणुकीमध्ये आरक्षित जागांवर लढणाऱ्या इच्छुकांना त्यांची जात वैधता करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने जातपडताळणी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते . एकाच वेळी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची घाई सुरु केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्यासोबत जात पडताळणी साठी केलेल्या अर्जाची पोचपावती जोडावी लागणार आहे . त्यामुळे महाराष्ट्रभरात एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू आहे . मागील 24 तासात एकाच वेळी 50 हजार इच्छुकांनी ऑनलाईन जात पडताळणी उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात केल्याने सर्वर जाम झाला






















