झटका आला की लॉकडाऊन करणार हे सरकारचे धोरण : प्रवीण दरेकर
जव्हार मधील सार्वजनिक बांधकाम, आदिवासी, ग्रामविकास, जलसंधारण विभागाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार.त्या आदिवासी कुटुंबाला पाच लाखांची भाजप मदत करणार प्रवीण दरेकर यांचे जव्हार येथे आश्वासन.
पालघर : मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथील अनंता मौळे यांच्या घराला भीषण आग लागून 2 मुलं त्यांची पत्नी, आई असे आगीत मृत्युमुखी पडले. सदर मौळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मोखाडा ब्राम्हणपाडा येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनीषा चौधरी, भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, तहसीलदार व पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊनच्या शक्यतेवरुन दरेकर यांनी सरकारवर टीका केली.
जव्हार येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले की, मौळे यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला असता डोळ्यादेखत पोटाची दोन मुलं आगीत भस्मसात होणं त्याचबरोबर स्वतःची सदाचरणी असलेली पत्नी या आगीत मृत्युमुखी पडणे स्वतःची आई यापेक्षा भीषण दुर्दैव दुसरा असू शकत नाही, दुर्दैवाची गोष्ट अशी की या प्रसंगात झाल्यावर सरकार म्हणून येऊन त्या ठिकाणी आधार देण्याची आवश्यकता होती, पैसे आर्थिक मदत भले चार दिवस उशीर झाला तरी समजू शकतो परंतु या जेव्हा अशा प्रकारचे संकट कुटुंबावर येऊन गेले, परंतु त्यांना ज्या मदतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत तहसीलदारांशी या ठिकाणी बोललो तर अशा प्रकारचे कुठलेही प्रस्ताव याठिकाणी शासनाने केलेले नाही, कदाचित शासनाच्या निकषांमध्ये अशा प्रकारच्या आगीत मृत्युमुखीना मदत देण्याचे प्रावधान नसेल, परंतु शेवटी जेव्हा दोन घरातली मुलं जातात पत्नी, आई जाते त्यावेळेला निकषाच्या बाहेर येऊन चौकटीच्या बाहेर येऊन मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी राज्य सरकारकडे मागणी करतो आपल्या माध्यमातून या कुटुंबाचाव्यवसाय उध्वस्त झालेले आहे,
या कुटुंबार ट्रॅक्टरचं तीन लाखाचं कर्ज आहे, त्याशिवाय खाजगी व्यापाऱ्याचेही कर्ज आहे. दुसऱ्या बाजूला कुटुंबातील सदस्या गेल्याने अशा वेळेला त्याला आधार देण्याची आवश्यकता आहे. मी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवा मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे दरेकर यांनी सांगितले. यापुढे म्हणले कि आदिवासी कुटुंबाला साथ देण्याची गरज आहे, त्यांच्या मागेच निश्चितपणे भारतीय जनता पक्ष उभा आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने पाच लाखांची मदत दरेकर यांनी जाहीर केली.
सरकारला झटका येईल तेव्हा लॉनडाऊन : दरेकर
महाराष्ट्र सरकारला झटका आला की लॉकडाऊनची घोषणा केली जाते, सरसकट लॉकडाऊन त्या ठिकाणी करू नये कारण लोकं कुठेतरी आता स्थिरावत आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन केले तर लोक उपासमारीने मरतील आणि म्हणून तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर त्याच्या अकाउंटमध्ये पहिले पाच हजार रुपये टाका आणि करा. आमच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समर्थन दिले आहे, त्यामुळे लॉकडाउन करण्यापेक्षा नियमावली कडक करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.