महाराष्ट्र शासनाला संत नामदेवांचा विसर, शासकीय अभिवादन यादीतून नाव वगळले
महाराष्ट्र शासनाला संत नामदेवांचा विसर पडल्याचं दिसून आलंय. चालू वर्ष संत नामदेव यांचे 750 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करावे यासाठी वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
मुंबई: देशाचे प्रमुख व आद्य क्रांतिकारी संत म्हणून ओळख असलेल्या संत नामदेवांचा राज्य सरकारला विसर पडल्याचं दिसतं. संत नामदेव यांच्या 750 वे जयंती वर्ष असतानाही महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव महाराजांचे नाव नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाने यावर नाराजी व्यक्त करुन यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलंय.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्रात संत नामदेवांची 750 वी जयंती असल्याने हे वर्ष त्यांच्या नावाने साजरे करण्यात यावे अशी मागणी मुख्यंत्र्यांकडे केली आहे. नामदेव महाराजांचे नाव या यादीत समाविष्ट करावे आणि शासनाने आपली चूक दुरुस्त करावी अशी मागणीही या पत्रात अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे.
वारकरी संप्रदायाच्या देशभर विस्तरात नामदेवरायांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पंजाबमध्येही संत श्रीनामदेव महाराजांचे नाव आहे. संत श्रीनामदेव महाराज आपल्या आयुष्याची शेवटची 20 वर्षे पंजाबमध्ये होते. शीख धर्मात संत नामदेवाना 'भगत नामदेव' म्हणून ओळखले जाते. आजही इतक्या वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत संत नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.
भीती खरी ठरली! पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण
विशेषतः पंजाबमधील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळत आहे. संत नामदेव महाराज 13 व्या शतकात पंजाबमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या 65 पदांचा समावेश गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथात केले आहे. संत नामदेव महारांजानी शीखधर्माला प्रेरणा दिली. घुमान येथे नामदेवांचे मंदिर आहे. उत्तर भारतातील संत नामदेव पहिले संत होते. त्यांनतर होऊन गेलेल्या अनेक संतांनी संत नामदेव महाराजांचा उल्लेख केलेला आहे.
अशा आद्य संताचा त्यांच्या मायभूमी मधील सरकारला विसर पडावा हे दुदैवी असल्याची भावना नामदेव महाराजांचे 17 वे वंशज निवृत्ती महाराज नामदास बोलून दाखवतात. याबाबत अजूनही वेळ न गमावता हे वर्ष संत नामदेव जयंती वर्ष घोषित करून महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी मुख्यंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, पोलिसांकडून तपास काढून घ्यावा : चित्रा वाघ