पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, पोलिसांकडून तपास काढून घ्यावा : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली.
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही. तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली. काही वेळापूर्वीच चित्रा वाघ माहिती घेण्यासाठी वानवडी पोलिसात गेल्या होत्या. तिथे पोलिसांच्या वर्तणुकीवर नाराज होत वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राठोड प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास काढून इतर पोलिसांना तपास द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच पुणे पोलिसांनी आतापर्यंत अरुण राठोडची चौकशी केलीच नाही, अरुण राठोडची चौकशी केल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गंभीर आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं होतं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड आणि त्यांच्या पीएचा आवाज असल्याचा दावा सोशल माध्यमांमधून करण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरूणी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत रहात होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी 7 फेब्रुवारीच्या रात्री तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. याला कारण ठरलंय या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन ऑडिओ क्लिप. यात पुजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्यांचे संभाषण आहे. संभाषणाच्या भाषेवर त्यांच्यात नेमकं काय संबंध होते? हा प्रश्न निर्माण होतो आहे.
मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे.
संबंधित बातम्या :