Corona VAccination | मोफत लसीकरण करण्यास राज्य सरकार सकारात्मक, नवाब मलिक यांची माहिती
राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोफत लसीकरणासाठी अनुकूल असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबई : देशभरात येत्या 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचा मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार का? असा प्रश्न होता. तर आता राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोफत लसीकरणासाठी अनुकूल असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं की, मागील मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे यावर चर्चा झाली होती. चांगली आणि स्वस्त 15 कोटी लसी विकत घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार सकारात्मक आहेत. यासाठी ग्लोबल टेंडर काढून 15 कोटी लस विकत घेणार आणि मोफत लसीकरण राज्य सरकार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
देशात 14 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार देशात एकूण 20 लाख 19 हजार 263 सत्रांच्या माध्यमातून कोविड लसीच्या 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 92 लाख 90 हजार 528 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 59 लाख 95 हजार 634 आरोग्य सेवा कर्मचारी, 1 कोटी 19 लाख 50 हजार 251 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 62 लाख 90 हजार 491 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाच्या 4 कोटी 96 लाख 55 हजार 753 लाभार्थांनी लसीची पहिली मात्रा आणि 77 लाख 19 हजार 730 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील,4 कोटी 76 लाख 83 हजार 792 लाभार्थी (पहिली मात्रा), 23 लाख 30 हजार 238 लाभार्थी (दुसरी मात्रा) इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :