'शासकीय रुग्णालयाचा ICU फुल्ल, सर्व उपाय खुंटले' वैद्यकीय अधीक्षकांची पोस्ट वायरल
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील क्षमता संपत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधीक्षकांची पोस्ट व्हायरल होत आहे.
सोलापूर : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सारेच हतबल झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणांवरचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. यामध्ये खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारांसाठी चालढकल केली जात असल्याचे प्रसंग उघडकीस आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील ताण प्रचंड वाढला आहेत. रुग्णालयातील आयसीयू पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी पुढे यावे या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल होतेय.
काय म्हटलंय पोस्टमध्ये गुरुवारी रात्रीपर्यंत आयसोलेशन वार्डमध्ये 23 गंभीर रुग्ण होते. रात्री 11 च्या दरम्यान अजून 2 गंभीर रुग्णांना अॅडमिट करावे लागले. आपली 25 बेडची आय.सी.यु फुल्ल झाली आहे. सिरीयस रुग्णांना अॅडमिट करून घेण्याची सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली आहे. रात्रीतून कोणी गोरगरीब रुग्ण आला तर कुठे ठेवायचे हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर पडला आहे.
इतरवेळी ओढाचढीने रुग्णांना अॅडमिट करणार्या खासगी रुग्णालयांनी या भीषण संकटात रुग्णालयाचे दरवाजे बंद ठेवले आहेत. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, उपायुक्त सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहेत. पण खासगी रुग्णालये दाद देईनात. गुरुवारी रात्री उपायुक्तांना फोन करून सांगितले आहे. उपायुक्तांनी तात्काळ चौकशी करून सांगतो असे सांगितले आहे. पण खासगी रुग्णालये प्रतिसाद देतील असे मला वाटत नाही.
Corona Updates | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 80 हजारांवर; आज 1475 रुग्ण कोरोनामुक्त
बंधूंनो, न जाणो आपल्यापैकी कुणाच्या जवळच्या व्यक्तीला आज आय. सी. यु. उपचाराची गरज भासली तर काय करायच? खरंच. आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्यात एवढी हतबलता कधीच आली नव्हती. माझ्या पत्रकार बांधवांनो, सर्व काही आता तुमच्याच हातात आहे. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की गोरगरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करा. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद काय असते हे दाखवून द्यायची यापेक्षा दुसरी कुठलीच संधी मिळणार नाही. खासगी रुग्णालये उघडायला भाग पाडा. सर्व उपाय खुंटले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यावरच आता भरोसा आहे. सोलापूरचे गोरगरीब रुग्ण तुम्हाला आयुष्यभर दुवा देतील." असा टाहो वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी फोडला आहे.
Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट