3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जारी, 648 कोटी 15 लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता
राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय घोषित केला आहे. याद्वारे 648 कोटी 15 लक्ष 41 हजार रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.
मुंबई : राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय घोषित केला आहे. यापूर्वी 2 हेक्टर पर्यंत मदत केलेल्या ज्या खातेदारांना जमीन तीन हेक्टरपर्यंत असेल अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आज शासन निर्णय घोषित केला आहे. याद्वारे 648 कोटी 15 लक्ष 41 हजार रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून एकूण 8 हजार 139 कोटी इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित केले असल्याची माहिती मंत्री जाधव पाटील यांनी दिली आहे.
या विशेष निर्णयाचा फायदा राज्यातील 6 लक्ष 12 हजार 177 शेतकऱ्यांना होणार
आजच्या शासन निर्णयाद्वारे 3 हेक्टर ( 7.5 एकर) पर्यंत जमीन बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना देखील विशेष बाब म्हणून मदत करण्यात असलेली असून या विशेष निर्णयाचा फायदा राज्यातील 6 लक्ष 12 हजार 177 शेतकऱ्यांना होणार असून त्यांचे 6 लक्ष 56 हजार 310 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. या शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंतची मदत यापूर्वीच मंजूर करण्यात आलेली असून ही वाढीव मदत अतिरिक्त 1 हेक्टर साठी आहे.
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले होते. या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळं संसार उघड्यावर होते. तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमिन देखील वाहूनगेली होता. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पुरामुळं झाल्याचं पाहायला मिळालं.
काय आहेत शासकीय मदतीचे निकष?
आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास 5,400 ते Rs 16,000 पर्यंत मदत मिळणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 (पक्के) ते 4,000 (कच्चे) पर्यंत मदत दिली जाईल. झोपडीसाठी 8,000 आणि गोठ्यासाठी Rs 3,000 ची मदत मिळणार आहे.
किती मिळणार नुकसान भरपाई
जिरायत पिकांसाठी 8,500 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 प्रति हेक्टर (जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत) मदत मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास (केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना) 47,000 प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे.
























