सालेकसा ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरण! गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर, नागरिक संतप्त
सालेकसा नगरपंचायत ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरणात वातावरण चांगलेच तापले असताना आता पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे.
Gondia : सालेकसा नगरपंचायत ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरणात वातावरण चांगलेच तापले असताना आता पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. त्यामुळं अनेक नागरिक हे प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत होते. यावेळी पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करत नागरिकांना पांगवले. यावेळी तृतीयपंथी असलेल्या एका आंदोलनकर्त्याने प्रशासनाचा जोरदार विरोध केला. प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी संपूर्ण गर्दी तहसील कार्यालयाच्या बाहेर पांगवली आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
प्रचंड तणावानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली
गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळं नागरिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांसह तृतीयपंथीने प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. प्रचंड तणावानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सालेकसा नगरपंचायतची निवडणूक 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. सर्व केंद्राध्यक्षांनी मतदानाची माहिती सादर करून सीलबंद ईव्हीएम मशीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुपुर्द केल्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी कंट्रोल युनिटमधील क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सील काढायला लावले. ही माहिती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. 3) तहसील कार्यालय गाठून यावर आक्षेप घेत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. यावरुन येथे सायंकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. राजकीय पक्षांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत क्लोजर बटनची शहानिशा करण्याची प्रक्रिया आवश्यक होती तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर का करण्यात आली नाही. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. या प्रकरणाला घेऊन राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. यामुळे बुधवारी तहसील कार्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. तसेच जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
कोणत्याही निवडणुकीत मतदान सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष चाचणी मतदान घेऊन पुन्हा शून्यावर ठेवले जाते. निर्धारित वेळेत मतदान सुरू करून सायंकाळी मतदान संपल्यानंतर केंद्राध्यक्षांची दैनंदिनी आणि ईव्हीएममध्ये झालेले मतदान एकत्रित करून शेवटी क्लोज बटन दाबून ईव्हीएम मतदान प्रतिनिधी, केंद्राध्यक्षाद्वारे सील केले जाते. सील लागलेली ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये कडेकोट ठेवून मतमोजणीच्या दिवशीच सर्वांसमक्ष सील तोडून मतमोजणी केली जाते. परंतु, नगरपंचायत सालेकसा येथे मतदान केंद्रावरून सीलबंद करून आणलेली ईव्हीएम क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील तोडून खात्री करण्यात आली. परंतु, हे काम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात आले नाही. त्यामुळे यावर आक्षेप घेत राजकीय पक्षांनी गोंधळ घातला.
























