Maharashtra Police : राज्य पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना पीएसआय होण्याची सुवर्णसंधी; 250 पदांसाठी भरती होणार
महाराष्ट्र राज्य पोलिस दलामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेल्यांना उपनिरीक्षक पदासाठी 30 जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलिस दलामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेल्यांना पीएसआय होण्यासाठी सुवर्णसंधी आहे. 250 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी 30 जुलै रोजी परीक्षा होणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- 2021 चे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 जून 2022 आहे. ही परीक्षा राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या 6 केंद्रावर परीक्षा होईल. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी अर्ज दाखल करतानाच एका ठिकाणाची निवड करावी लागणार आहे. परीक्षा शुल्क आॅफलाईन तसेच आॅनलाईन भरता येणार आहे.
जिल्हा केंद्र बदलीबाबत विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याने अर्ज दाखल करतानाच सोयीचे ठिकाण निवडावे लागेल. सर्वसाधारण गटातील कमाल वयोमर्यादा 35 वर्ष असून मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा 40 वर्ष आहे. मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ प्रश्नांवर आधारित 300 गुणांची असेल. शारीरिक चाचणीसाठी 100 गुण असतील. अधिक माहितीसाठी https://mpsc.gov.in/ वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.