12 वर्षानंतर जालना येथील स्टील कारखानदारांना सोन्याचे दिवस!
लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या जालना येथील स्टील उद्योजकांना आता सोन्याचे दिवस आले आहेत.या स्टील उद्योगांमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 50 हजार लोकांना रोजगार मिळत आहे.
जालना : शहरातील स्टील उद्योगाला एक तपानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दिवस आले आहेत. सध्या बांधकामसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचे भाव 12 वर्षानंतर 50 हजार प्रतिटन एवढे झालेत. लॉकडाऊन काळात मोठ्या ससंकटात सापडलेल्या या उद्योगाला आता मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आलेत. देशात लॉकडाऊन नंतर पूर्णपणे बंद असलेल्या बांधकामाच्या व्यवसायात उभारी आल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांची मागणी वाढली आहे.
गेल्या 8 महिन्यात या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवकदेखील घटली आहे. परिणामी सळ्यांच्यासाठी लागणारा प्रक्रिया खर्च वाढल्याने देखील ही भाववाढ झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. जालना शहरात 14 मोठे स्टील उद्योग असून 22 लहान रिरोलिंग मिल आहेत. या मिलमध्ये बांधकामासाठी वेगवेगळ्या आकाराचे लोखंडी बार तयार केले जातात.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 50 हजार लोकांना रोजगारजालना जिल्हा बियाणांची पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र, त्यापाठोपाठ गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेला हा स्टील उद्योग सुद्धा जालन्याची देशात वेगळी ओळख करून देतो. बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांमध्ये काळानुरूप दर्जेदार उत्पादन करण्याबरोबर गुणवत्ता राखत हा उद्योग अद्याप स्थिर आहे. दररोज या उद्योगातून 7000 हजार टन सळ्यांची निर्मिती होते, या उद्योगातून दिवसाला 300 कोटींची आर्थिक उलाढाल होते. अंदाजे 15 हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या उद्योगात प्रत्यक्ष 20 हजार लोकांचा तर अप्रत्यक्ष 34 हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
जालन्यातील भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीचे संचालक नितीन काबरा यांच्या माहितीनुसार सध्या "देशात कोरोना लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प झालेला बांधकाम उद्योग पुन्हा सुरू झाल्याने मोठी मागणी वाढली, 'शिवाय स्क्रॅप (कच्चे लोखंड) पाहिजे त्या मागणी प्रमाणे मिळत नसल्याने ही दर वाढ झालीय, दरम्यान हे भाव दररोज बदलत असल्याने या भावात किती सातत्य राहील हे सांगणे कठीण आहे.
या उद्योगात बांधकामासाठी आवश्यक असलेल्या 6 एम एम, 8 एम एम, 12 एम एम प्रकारातील सळ्या 6 एम एमचा सध्या भाव 47 हजार 700 रुपये प्रतिटन अधिक 18 टक्के जीएसटी असा आहे तर 8 एम एम 45 हजार प्रतिटन अधिक जीएसटी असा आहे.
2008 नंतर हा भाव 50 हजार प्रतिटनावर पहिल्यांदा पोहचलाय, मागणी अशीच कायम राहिल्यास हे दर स्थिर राहू शकतात असाही अंदाज व्यक्त होतोय, कोरोना काळात अनेक लहान मोठ्या उद्योगांचे कंबरडे मोडले. हजारो कोटींची गुंतवणूक असलेल्या या कारखानदारीत या स्टील उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, या भाव वाढीने या उद्योगाला सध्या तरी सोन्याचे दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही.