(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्ड
कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात बोकडाची दहशत पाहायला मिळतेय. येणार्या-जाणार्या लोकांना बोकड धडक मारत असल्याने या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत.
कोल्हापूर : पळा पळा बोकड आला असे आवाज सध्या कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात सतत ऐकायला मिळत आहेत. कारण आहे नौकुड गावात देवीला सोडलेला एक बोकड. या बोकडाची दहशत पाहायला मिळतेय. सध्या या संपूर्ण गावात बोकडाची दहशत पसरली आहे. येणार्या-जाणार्या लोकांना, दुचाकीस्वारांना हे बोकड मागून धडक मारत असल्याने या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मी देवाचा बोकड नौकुड गावातील लोकांच्या जीवावर उठलेला दिसतोय. गाडीचालक दिसला की हा बोकड त्यांचा पाठलाग करत त्यांना मारत आहे. आत्तापर्यंत त्या बोकडाने १२ जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे गावात त्याची दहशत निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत माहिती कळावी यासाठी गावात एक डिजिटल फ्लेक्स लावण्यात आला आहे. यामध्ये 'सर्व नागरिकांना कळविण्यात येते की गावातील लक्ष्मी देवाचा बोकड गाडी धारकांना मारत आहे. याची नोंद घेऊन सावधानता बाळगावी', असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या पंचक्रोशीत या बोकडाची जोरदार चर्चा सुरू आहे.