(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्लोबल टीचरनंतर आता 'Global Student Of The Year' पुरस्कार, लाखोंचं बक्षीस, भारतातील 4 विद्यार्थी शर्यतीत
Global student of the year : ग्लोबल स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार आता दिला जाणार असून अंतिम विजेत्या विद्यार्थ्याला 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 75 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
मुंबई : बार्शीतील जिल्हा परिषदेचे रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर ग्लोबल पुरस्कार आपल्याकडे माहिती झाला. आतापर्यंत केवळ शिक्षकांना दिला जाणारा हा पुरस्कार आता शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दिला जाणार आहे. ग्लोबल स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार आता दिला जाणार असून अंतिम विजेत्या विद्यार्थ्याला 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 75 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. Global Teacher Prize 2020 Winner रणजीतसिंह डिसले यांनी याबाबत एबीपी माझा डिजिटलला सविस्तर माहिती दिली आहे.
ग्लोबल टीचर्स पुरस्कार देणाऱ्या वार्की फाऊंडेशन आणि चेग ओआरजी या जागतिक स्तरावरील संस्थांकडून हा पुरस्कार दिला जाणार आहे. या संस्थांनी यंदा ग्लोबल स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्याचं जाहीर केलंय. त्या स्पर्धेच्या फेऱ्याही सुरु झाल्या आहेत. हे या स्पर्धेचं पहिलंच वर्ष असून या वर्षी तीन हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. आता तीन हजार विद्यार्थ्यांमधून टॉप 50 ची यादी घोषित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टॉप 50 मध्ये चार भारतीय विद्यार्थी आहेत.
ग्लोबल स्टुडंट ऑफ द इयरच्या स्पर्धेत भारतातून चार विद्यार्थी या अंतिम 50 जणांच्या यादीत आहेत. यामध्ये आयुष गुप्ता, नवी दिल्ली, कैफ अली, नवी दिल्ली, सीमा कुमारी, रांची, विपिन कुमार शर्मा, नारनौल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या उपक्रमाविषयी ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी सांगितलं की, यंदा या उपक्रमाचं पहिलंच वर्ष आहे. वेगळं आणि समाजउपयोगी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यासाठी नोंदणीची प्रक्रिया मार्च 2021 मध्ये संबंधित संस्थांच्या वेबसाईटवर सुरु झाली होती. जगभरातील तीस देशांतील तीन हजार विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. यातून अंतिम 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
शिक्षकांसाठी 10 लाख अमेरिकन डॉलरचा पुरस्कार याच संस्थांकडून दिला जातो. या वर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी देखील असाच पुरस्कार सुरु केला आहे. विद्यार्थ्यांची युनिक कामं, त्यांचं काम या संस्थांकडून तपासलं जातं. चांगलं काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी नॉमिनेट केलं जातं. यामध्ये विद्यार्थ्याचं स्वत:साठी, आपल्या सहकारी विद्यार्थी मित्रांसाठी आणि समाजासाठी उपयोगी कामांचं मूल्यमापन केलं जातं. यासोबत त्यांचे अॅकॅडमिक रेकॉर्ड्स देखील तपासले जातात. यासाठी 16 वर्षांवरील विद्यार्थी सहभागी होऊ शकतो, रोज शाळेत जाणारे किंवा पार्टटाईम शाळेत जाणारे विद्यार्थी यात नॉमिनेट होऊ शकतं. मुलांना लहान वयात ही संधी मिळते ही गोष्ट महत्वाची आहे, असं डिसले यांनी सांगितलं.