राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य, लालबागच्या राजाचंही मोठ्या उत्साहात विसर्जन
मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, अनेकांचं कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य, मुंबईच्या लालबागच्या राजाचंही मोठ्या उत्साहात विसर्जन.
मुंबई : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. अनेकांनी कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य दिलं.
आजच्या विसर्जनाला मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील जी उत्तर विभागात पालिकेच्या वतीने 6 तलाव तयार केले आहेत. यंदा देखील कोरोनामुळे सर्वसामान्यांना कृत्रिम तलावाजवळ येऊन बाप्पाचं विसर्जन करता येणार नाही. याठिकाणी पालिकेच्या वतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकट्या जी उत्तर विभागात ठिकठिकाणी 70 जीवरक्षक बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तगडा तैनात करण्यात आला आहे. प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेकांचा भर
दहा दिवसांपूर्वी वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय. नाशिकमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेकांचा भर दिसत असतांनाच आज सकाळपासूनच घरगुती गणपती विसर्जनसाठी गणेश मूर्ति संकलन केंद्रावर गणेशभक्त दाखल होतायत. बाप्पाची मनोभावे आरती करत कृत्रिम तलावात डुबकी देत मूर्ती दान केल्या जातायत.
औरंगाबादेत संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक नाही
औरंगाबादेत वर्षानुवर्षे गणपती विसर्जनाची प्रथा जोपासली जाते. औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्याशिवाय सार्वजनिक मंडळ मिरवणूक काढत नाहीत. आज सकाळी संस्थान गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली अथर्वशीर्ष पठाण झालं. सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यानंतर जागेवरच विसर्जन करण्यात आलं.
हिंगोली शहरात सहा कृत्रिम तलावांची निर्मिती
गणेश विसर्जन कुंड माझी वसुंधरा अभियानांतर्गत हिंगोली शहरात एकूण सहा कृत्रिम तलावांची निर्मिती हिंगोली नगर परिषदच्या वतीने करण्यात आली तर ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करणे शक्य नाही, अशा ठिकाणी दोन फिरते कृत्रिम तलावांची निर्मिती हिंगोली नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या कृत्रिम तलावात प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सामान्य हिंगोलीकर यांना बाप्पाचे विसर्जन हे थेट दारातच करता यावं या उद्देशातून ह्या संपूर्ण संकल्पना आहे ती निर्माण करण्यात आली आहे.
पुण्यातील मानाच्या बाप्पांचं विसर्जन
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन पूर्ण झालं आहे. यंदाही कोरोनामुळे विसर्जन मिरवणूक साधेपणानेच काढण्यात आली. त्यामुळे गणेश भक्तांचा हिरमोड झालेला पहायला मिळाला.
अकोल्यात आज गणेश विसर्जन अगदी शांततेत
अकोल्यात आज गणेश विसर्जन अगदी शांततेत पार पडलंय. कोरोना निर्बंधांमुळे यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक नसल्याने काहीसा कमी उत्साह होताय. आज सकाळीच शहरातील मानाचा गणपती असलेल्या बाराभाई गणपतीचं पुजन करण्यात आलंय. महापालिकेने मोर्णा नदीकाठावर तीन ठिकाणी विसर्जनासाठी गणेश घाटाची निर्मिती करण्यात आली होतीय. शहरातील गणपतींचं गांधीग्राम येथील पुर्णा नदी आणि बाळापूरच्या मनकर्णिका नदीत विसर्जन करण्यात आलंय. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विसर्जन शांततेत पार पडलंय.