(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganeshotsav 2021 : गायीच्या शेणापासून घडविल्या गणेशमूर्ती, बोरगावच्या कुस्तीपटूची अभिनव संकल्पना
Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील एका कुस्तीपटूनं गणेशमूर्ती बनविण्याची अभिनव संकल्पना घडवून आणली आहे.
गुहाघर : गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्याची अभिनव संकल्पना चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील एका कुस्तीपटू तरुणानं प्रत्यक्षात घडवून आणली आहे. केवळ 5 टक्के माती आणि ती भिजविण्यासाठी गोमूत्र यांचा वापर करुन शेणापासून अशा मूर्ती बनविण्यात हा तरुण प्रथमच यशस्वी झाला आहे. आतापर्यंत 800 मूर्तींना पनवेल आणि पुण्यातून मागणी आल्यानं त्या पाठविण्यात आल्याची माहिती कुस्तीपटू वैभव चव्हाण यानं दिली आहे.
बोरगाव मोरेवाडी येथील वैभव शिवाजी चव्हाण हा 27 वर्षीय कुस्तीपटू असून त्यानं अग्रीकल्चरचं शिक्षण घेतलं आहे. रत्नागिरी जिल्हा कुस्ती पैलवान मानांकन यादीत तो सलग 12 वर्षे प्रथम आलेला आहे. राज्य कुस्ती संघटनेचा तो अधिकृत पंचही आहे. अॅग्रीकल्चर झालेल्या वैभवनं प्रथमच यावर्षी गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प केला होता. गायीच्या शेणापासून या मूर्ती बनविण्याची ही संकल्पना पूर्णत्वासही गेली. शेण मिळविण्यासाठी त्यानं गायीही पाळल्या आहेत. गणेशमूर्ती बनविताना वैभवनं 5 टक्के माती, 5 टक्के काथ्या तर 90 टक्के गाईच्या शेणाचा वापर केलेला आहे. पाणी न वापरता मिश्रण करण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्यात आलेला आहे. मूर्ती वजनाला हलक्या असून पाण्यात लवकर विरघळतात. एवढंच नाहीतर या मूर्तींचं घरातील पाण्यात विसर्जन केल्यानंतर कंपोस्ट मिळतं. हे कंपोस्ट आपण फुलं आणि फळझाडं यांना टाकू शकतो. मूर्ती बनवताना भारतीय वृक्षांच्या बियांचा वापर केलेला आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर या बियांमार्फत जंगल वाढीस चालना मिळणार असल्याचं वैभव यानं सांगितलं आहे.
शेणापासून वैभवने 800 मूर्ती बनविल्या आहेत. यातील 760 मूर्तींना पुणे, पनवेल येथील सामाजिक संस्थानी आँर्डर केल्याने त्या पाठविण्यात आल्या आहेत. या संस्था त्यांच्या भागात मोफत वाटप करणार आहेत. गणेशमूर्ती 18 इंचाच्या असून 3 प्रकारचे मॉडेल तयार केलेले आहेत. मूर्ती बनविण्यासाठी 30 मुलांचा ग्रुप असून ही सर्व मुलं बाहेरील तालुक्यातील असून बोरगाव येथे येऊन वैभवला या मदत करीत आहेत. वैभवची ही अभिनव संकल्पना पहिल्याच वर्षी यशस्वी झाली असून जवळच्या गावांतूनही कधीतरी माझ्या मूर्तींना मागणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याच्या उपक्रमाचे रामपूर विभागात कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :