Gadchiroli Rain : गडचिरोलीत पावसाचा कहर! आलापल्ली-भामरागड मार्ग बंद, पर्लकोटा नदीला पूर, 130 गावांचा संपर्क तुटला
Gadchiroli Rain Latest Update : राज्यात (Maharashtra Rain) गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात 130 गावांचा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.
Gadchiroli Rain Latest Update : राज्यात (Maharashtra Rain) गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. प्राणहिता नदीची पाणीपातळी घटल्याने आलापल्ली- नागेपल्ली येथील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. या महसुली मंडळात 2 दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने दोन्ही गावात प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. सद्यस्थितीत आलापल्ली-भामरागड मार्ग पर्लकोटा नदी फुगल्याने बंद झाला आहे. यामुळे तालुक्यातील 130 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा येथील महाबंधाऱ्याची सर्व 85 दारे खुली करण्यात आली आहेत. यामुळे सिरोंचा तालुक्यातील बॅक वॉटरमुळे खेडी रिकामी करण्याचे संकट टळण्याची शक्यता आहे. प्रशासनाची नजर गोसेखुर्दच्या पाण्यावर देखील आहे. जिल्ह्याला वळसा घालणाऱ्या वैनगंगा नदीच्या।पाणीपातळीत वाढ झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने तासातासाला याबाबत माहिती घेतली जात आहे.
गोंदिया- तिरोडा मार्ग बंद, रस्ता गेला वाहून
गोंदिया जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांना बसला आहे. गोंदिया तिरोडा मार्गाचं काम सुरू असून एकोडी गावाजवळ पुल बांधकाम सुरु आहे. त्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र तो रस्ताही पावसाने वाहून गेल्याने गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
गोंदेखारी नाला ओव्हरफ्लो झाल्याने 25 घरात शिरले पुराचे पाणी
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील गोंदेखारी नाला ओव्हरफ्लो झाल्याने 25 घरात पुराचे पाणी शिरले असून गोंदेखारी गावात नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काल आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असल्याने तुमसर तालुक्यातील चांदपूर तलावाच्या प्रवाहाचे पाणी सरळ गोंदेखारी नाल्यात आल्याने गोंदेखारी नाल्याला पूर आला. त्यामुळे नाल्याजवळील 25 घरात पुराचे पाणी शिरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स